लोणीकंद,(पुणे): मुळा-मुठा नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियावर गुन्हे शाखा युनिटच्या पोलिसांनी मोठी कारवाई केली. या कारवाईत पोकलैंड, 2 ट्रॅक्टर व त्यासोबत ट्रॉली व 8 ब्रास वाळू, असा 35 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून वाळू माफियावर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पंकज सदाशिव गायकवाड (वय-38, रा. भैरोबा वस्ती, कोलवडी ता.हवेली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या वाळू माफियाचे नाव आहे. पंकज गायकवाड हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर याअगोदर दोन वेळेस तडीपारची कारवाई करण्यात आली आहे. तसेच कोंढवा, हडपसर, पौड, लोणीकंद पोलीस ठाण्यातही गुन्हे दाखल असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट 6 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (ता.07) लोणीकंद शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखा युनिट 6 चे पथक थेऊर ते कोलवडी गावातील मुळा मुठा नदी पात्रामध्ये गस्त घालीत होते. यावेळी अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या इसमांचा शोध घेत असताना शितोळे वस्ती, कोलवडी येथे ट्रॅक्टर व पोकलैंड दिसून आले.
पोलिसांनी सदर ठिकाणी पथकामार्फत कोणालाही पळून जाण्याची संधी न देता छापा टाकला. यावेळी पंकज गायकवाड व इतर साथीदार यांना ताब्यात घेण्यात आले. तसेच नदी पात्रातील अवैधरित्या वाळू उपसा करण्यासाठी वापरलेली पोकलैंड, 2 ट्रॅक्टर व त्यासोबत 2 ट्रॉली, 8 ब्रास वाळू, असा 35 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गु.र.नं. 214/2025 भा.दं.वि. कलम 303 (2) तसेच खान व खनिज (विकास व नियमन) अधिनियम 1957 मधील कलम 4, 21 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, पंकज गायकवाड याच्यावर यापूर्वी कोंढवा, हडपसर, पौड, लोणीकंद पोलीस ठाण्यात खून, दरोडा, डांबून ठेवणे, मारहाण अशा अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.
सदरची कारवाई अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे )शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, सहा पोलीस आयुक्त (गुन्हे- 2) राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 6 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस अंमलदार बाळासाहेब सकटे, रमेश मेमाणे, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, सुहास तांबेकर, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषीकेश व्यवहारे, शेखर काटे, गणेश डोंगरे, नितीन धाडगे, बाळासाहेब तनपुरे, मपोअं प्रतिक्षा पानसरे, किर्ती मांदळे यांनी केली आहे.