न्हावरे,ता.03 : न्हावरे फाटा ते करडे रस्त्याच्या चौपदरी करणाच्या कामाबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या रस्त्याचे काम पूर्ण करण्याची प्रत्यक्ष मुदत संपलेली आहे. तरीही, केलेल्या निकृष्ट कामाचे बिल दोन टप्प्यात कोणाच्या आशीर्वादाने कंत्राटदाराला मिळवून देण्यात आले? याबाबत तालुक्यात उलट-सुलट चर्चा सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मुदत 5 जानेवारी 2025 रोजी संपलेली आहे. तसेच कंत्राटदाराला अपूर्ण राहिलेल्या कामासाठी मुदतवाढ देण्यात आलेली नसतानाही, कंत्राटदाराकडून रस्त्याचे निकृष्ट काम सुरूच आहे. मात्र, कंत्राटदाराकडून प्रत्यक्ष कामास दिरंगाई केली म्हणून संबंधित प्रशासनाने कंत्राटदाराकडून किती दंड वसूल केला. त्याचप्रमाणे झालेल्या निकृष्ट कामाची चौकशी करून संबंधित कंत्राटदार व अधिकारी यांच्यावर कारवाई होणार का? की, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी निकृष्ट कामे करणाऱ्या अधिकारी व कंत्राटदार यांच्याबाबत केलेला वादा, कारवाईचा दिखावा करून अधिकारी कंत्राटदाराला पाठीशी घालणार, याबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजी आहे.
न्हावरे फाटा ते करडे सुमारे आठ किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी व सरदवाडी-करडे नवीन ‘एमआयडीसी’ परिसरातील विविध कामांसाठी शासनाने 58 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. त्यामध्ये जलशुद्धीकरण केंद्र बांधणे ( 4 कोटी रुपये) सामायिक सुविधा केंद्र म्हणजेच सरदवाडी-करडे नवीन ‘एमआयडीसी’ येथे ऑफिस बांधणे ( 8 कोटी रुपये) अग्निशामक केंद्र बांधणे ( 6 कोटी रुपये) एमआयडीसी ऑफिसला कंपाऊंड बांधणे ( 1 कोटी रुपये) तसेच एमआयडीसीचे मुख्य प्रवेशद्वार बांधणे (1 कोटी रुपये) आणि उर्वरीत 38 कोटी रुपयांमध्ये न्हावरे फाटा ते करडे रस्त्याचे चौपदरीकरण करणे असे कामाचे स्वरूप असताना, सर्व कामे पूर्ण करण्याची मुदत 5 जानेवारी 2025 रोजी संपलेली आहे. अशी माहिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ स्थापत्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणावरील विकास निधी हा कामे निकृष्ट करून कंत्राटदार व अधिकारी यांची घरे भरण्यासाठी आहे की फक्त जनतेची दिशाभूल करण्यासाठी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
जुना रोड आहे तसाच ठेऊन दोन्ही बाजूने 7.5 मीटरच्या दोन लेन तसेच 1.2 मीटरच्या साईड पट्ट्या व 0.75 मीटरचा रस्त्याच्या मधोमध दुभाजक टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र, कामाची मुदत संपली तरी काम पूर्ण झाले नाही. याला जबाबदार कोण?
संबंधित कामे लवकरच पूर्ण होतील. ज्या ठिकाणी काम निकृष्ट झाले आहे. ते काम कंत्राटदाराच्या निदर्शनास आणून पुन्हा नव्याने केले जाईल. तसेच शिरूरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याचा जुना आराखडा चुकीचा दिल्यामुळे काम पूर्ण करण्यास अडचणी येत आहेत.
-भुषण ठाणगे (कनिष्ठ अभियंता, स्थापत्य उपविभाग एमआयडीसी)
संबंधित रस्त्याचे काम खूपच निकृष्ट आणि दर्जाहीन झालेले आहे. त्यामुळे कंत्राटदार व अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी व पुन्हा नव्याने गुणवत्तापूर्ण काम करावे .
-राजेंद्र जगदाळे (मा.जि.प.सदस्य, न्हावरे-शिरूर ग्रामीण गट)