पुणे : पुण्यामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. २७ वर्षीय महिलेने शहरातील एका बड्या बांधकाम व्यावसायिकावर बलात्कार, जबरदस्तीने गर्भपात आणि शारीरिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. या बातमीने पुण्यातील बांधकामविश्वात एकच खळबळ उडाली आहे. अश्लील व्हीडीओ दाखवून अत्याचार केल्याचा २७ वर्षीय पीडितेचा गंभीर आरोप असून सोबतच दोन वेळा जबरदस्तीने गर्भपात करायला भाग पाडल्याचाही दावा महिलेने केला आहे. सुमेघ अरुण देवधर (वय ४३, रा. कोथरूड) असे आरोपीचे नाव आहे.
कोथरूडसह शहरातील विविध भागात त्याच्या अनेक स्थावर मालमत्ता आहेत. बांधकाम व्यावसायिक सुमेघ देवधर याने पीडितेला अश्लील व्हीडीओ दाखवले. जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले आणि दोन वेळा गर्भपात करायला भाग पाडल्याचे गंभीर आरोप सदर महिलेने केले आहेत. याप्रकरणी पुणे पोलिसांनी सुमेघ याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे बांधकामविश्वात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला वडगाव शेरी येथे आईसोबत राहत असून तिने सांगितले की, नोव्हेंबर २०२२ मध्ये कोथरूडमधील एका क्लबमध्ये ती जनसंपर्क विभागात काम करीत होती. तिथे सुमेघसोबत तिची ओळख झाली. पत्नीसोबत वाद होत असून लवकरच घटस्फोट घेणार असल्याचे त्याने सांगितले. डिसेंबर २०२२ मध्ये त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. पीडितेच्या तक्रारीनुसार, फेब्रुवारी २०२३ मध्ये सुमेघने तिला एका हॉटेलमध्ये लग्नाच्या आमिषाने बोलावले आणि तिच्यावर बलात्कार केला.
त्यानंतर सुद्धा त्याने त्याचे घर आणि कोरेगाव पार्क, प्रभात रोड आणि विमाननगरमधील हॉटेलमध्ये नेऊन अनेक वेळा तिच्यावर अत्याचार केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. सप्टेंबर २०२३ मध्ये पीडितेला गर्भधारणा झाल्याचे समजल्यानंतर तिने आरोपीकडे लग्नाची मागणी केली. मात्र, त्याने आपल्या व्यवसायाचे कारण देत लग्नास नकार दिला. त्यानंतर, त्याने तिला कोथरूडमधील एका खासगी रुग्णालयात जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडले.
अश्लील व्हीडीओ दाखवत जबरदस्तीने शारीरिक संबंध..
पहिल्या गर्भपातानंतर सुमेघ याने पुन्हा पीडितेला लग्नाचे खोटे आश्वासन दिले. तिचा विश्वास संपादन करीत त्याने तिला आपल्या ऑफिसमध्ये बोलावले आणि अश्लील व्हीडीओ दाखवत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. या अत्याचारांमुळे एप्रिल २०२४ मध्ये ती पुन्हा गर्भवती राहिली. त्यावेळीही तिला पुन्हा जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडल्याचे फिर्यादी महिलेचे म्हणणे आहे. सुमेघने घटस्फोटाबाबत खोटी माहिती दिली असून पत्नीशी त्याचे चांगले संबंध असल्याची माहिती तिला सप्टेंबर २०२३ मध्ये मिळाली. यावरून दोघांमध्ये वाद झाले. त्यानंतर ११ सप्टेंबर रोजी ती पुन्हा त्याच्या ऑफिसमध्ये गेली, जिथे सुमेघच्या चालकाने तिला जिवे मारण्याची धमकी दिली. १४ सप्टेंबर रोजी सुमेघने तिला आपटे रोडवरील एका हॉटेलमध्ये बोलावले. तेथे त्याची पत्नीदेखील उपस्थित होती. तिथेदेखील त्यांच्यामध्ये टोकाचे वाद झाले.
पोलिसांकडून अटकेला टाळाटाळ : पीडितेचा गंभीर आरोप
या सर्व घटनांमुळे पीडिता मानसिक तणावात गेली. तिच्या मनात आत्महत्येचे विचार यायला सुरवात झाली. त्याच काळात तिच्या आईचा अपघातही झाला. अखेर तिने सुमेघविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली. ‘‘पुण्यात अशा अनेक घटना घडत असून बिल्डर्स मुलींना लग्नाचे आमिष दाखवून फसवत आहेत. ते मुलींना भावनिकरित्या गुंतवून गैरफायदा घेतात. पोलिसांनी यावर कारवाई करावी, अशी माझी मागणी आहे. मला वाटते पोलीस त्याला अटक करण्यात टाळाटाळ करीत आहेत,’’ असे पीडितेचे आरोप केले आहेत.
पोलीस नेमकं काय म्हटले?
पीडितेच्या वकिलांनी तक्रार दाखल करत सर्व पुरावे पोलिसांना सादर केले आहेत. बंडगार्डन पोलीस ठाण्याचे एक अधिकारी म्हणाले की, ‘‘भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैद्यकीय तपासणी पूर्ण झाल्यानंतर पुढील तपास केला जाईल,’ असे ते म्हणाले.