लोणी काळभोर, (पुणे) : एमआयटी चौकात तरुणांच्या दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना शनिवारी (ता. ०६) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला होता. याच परिसरात वारंवार भांडणाच्या घटना होत असून पोलीस मात्र तात्पुरती कारवाई करून काहीही झाले नाही, असा आव आणीत आहेत. पोलीस कोणतीही कारवाई करीत नसल्याने परिसरातील सर्वसामान्य नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे.
लोणी काळभोर या ठिकाणी असलेल्या एमआयटी शिक्षण संस्थेत मोठ्या प्रमाणात बाहेरच्या राज्यातील, जिल्ह्यातील व काही स्थानिक तरुण शिक्षण घेत आहेत. येथील चौकात मोठमोठी हॉटेल्स, टपऱ्या आणि हातगाड्या असून ते रात्री १२ वाजेपर्यंत सुरु असतात. या ठिकाणी सर्रासपणे मुले – मुली टोळक्याने वावरतात. यामधील काही मुले दारू पिऊन महामार्ग व परिसरात गोंधळ घालतात. त्याचा या परिसरात राहत असलेल्या महिला, मुलांना व नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. पोलिस प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
एमआयटी चौकात जवळच असलेल्या हॉटेल व परिसरात दारू मिळत असल्याने तळीराम विविध वाहने, रिक्षात तसेच रस्त्यावर व खाद्यपदार्थाच्या हातगाडीवर दारू पित असतात. अनेकदा त्यांचा मुक्कामच तेथे असतो. दारू पिणाऱ्या या तरुणांमध्ये वारंवार वाद व शिवीगाळ होते. त्यामुळे या परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांचा अशा हुल्लडबाजांवर वचक राहिला नसल्याचे या परिसरात राहणारे नागरिक सांगत आहेत. येथे राहणारे नागरिकही पुरते हैराण झाले आहेत. मात्र,पोलिस प्रशासन सोईस्कर दुर्लक्ष करत असल्याचे जाणवत आहे.
दरम्यान, लोणी काळभोर पोलिसांनी या ठिकाणी येऊन पोलिसांनी भांडणे करणाऱ्या काही तरुणांना पोलीस ठाण्यात घेऊन गेल्याचे काही नागरिकांनी “पुणे प्राईम न्यूज” शी बोलताना सांगितले. मात्र त्याच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने वारंवार या घटनामध्ये वाढ होत आहे.
पोलिसांकडून कोणतीही कारवाई नाही…
या परिसरात असलेल्या टपऱ्या, हातगाड्या, हॉटेल या ठिकाणी सिगारेट, गांजा, आम्लयुक्त पिये, दारू आदींची सर्रासपणे विक्री सुरु आहे. मात्र लोणी काळभोर पोलिसांकडून आजतागायत कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे या ठिकाणी वारंवार भांडणाच्या घटना घडत असून पोलीस मात्र बघ्यांची भूमिका घेत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.
परिसरातील काही हॉटेल रात्रभर सुरु..
या परिसरात असलेली हॉटेल ही रात्रभर सुरु आहेत. पोलीस गाडीत गस्त घालीत असतात, मात्र त्यांना या ठिकाणी सुरु असलेले हॉटेल्स दिसून येत नाहीत. हे हॉटेल्स रात्रभर सुरु असल्याचे दिसून येत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. नेमकी या ठिकाणी असलेल्या टपऱ्या, हॉटेलवर पोलीस का कारवाई करीत नाहीत? याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.