हडपसर, (पुणे) : हडपसर- मांजरी फाटा चौकात मनोज जरांगे-पाटील यांच्या समर्थनार्थ रास्ता रोको आंदोलन केल्याप्रकरणी २० जणांवर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप लहाने पाटील, महेश टेळे पाटील, बाळासाहेब भिसे, अनिल बोटे, कुणाल मोरे, विजय भाडळे, रमेश तुपे यांच्यासह १० ते १५ अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती हडपसरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, मनोज जरांगे पाटील आणि समन्वयक समितीच्या आदेशानुसार महाराष्ट्रात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. त्यानुसार हडपसर-मांजरी फाटा चौकात मागील तीन दिवसापूर्वी संदीप लहाने पाटील, महेश टेळे पाटील, बाळासाहेब भिसे, अनिल बोटे, कुणाल मोरे, विजय भाडळे, रमेश तुपे यांच्यासह मराठा बांधवांनी मनोज जरांगे-पाटील यांच्या समर्थनार्थ रास्ता रोको आंदोलन केले होते.
यावेळी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. आंदोलकांना हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतले त्यानंतर नोटीस देऊन, प्रतिबंधात्मक कारवाई करून सोडण्यात आले. दरम्यान, आंदोलन झाल्यावर दोन दिवसांनतर पोलीस उपायुक्त विशेष शाखा पुणे शहर यांच्या जमावबंदीच्या आदेशाचा भंग केला म्हणून विविध कलमांतर्गत २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.