पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणात नव नवीन माहिती समोर येत आहे. अशातच आता या प्रकरणात सहभागी असलेले आणखी ३ जण पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आदित्य गोळे (वय २४), नितीन खैरे यांच्यासह आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी याप्रकरणातील आणखी तीन आरोपींना अटक केली आहे. त्यामुळे मोहोळ खून प्रकरण पोलिसांनी आतापर्यंत १३ जणांना ताब्यात घेतलं आहे. गुन्हे शाखेने शुक्रवारी रात्री या तिघांना अटक केली आहे.
कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा खून करण्यापूर्वी आरोपींनी मुळशी तालुक्यातील हाडशी परिसरात गोळीबाराचा सराव केला होता. त्यावेळी आरोपी नितीन खैरे हा मुन्ना पोळेकर यांच्यासह त्या ठिकाणी उपस्थित होता. याशिवाय शरद मोहोळचा खून करण्यासाठी आरोपींनी एक महिन्यापूर्वी कट रचला होता. यासाठी लागणाऱ्या संपूर्ण पैशाची व्यवस्था ही नितीन खैरे हा करत होता.
तर आदित्य गोळे यांनी बंदुकीसाठी पैसे दिले होते. मोहोळचा खून करण्यासाठी रचण्यात आलेल्या कटात हे दोघेही सहभागी होते. तर तिसरा आरोपी सुद्धा फोनद्वारे आरोपींच्या संपर्कात होता. या संपूर्ण कटात तो देखील सहभागी होता. अशी माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. सध्या तिन्ही आरोपींची पोलीस कसून चौकशी करत आहेत.