बारामती : राज्यातील महायुती सरकारने महिलांसाठी नवीन आणलेल्या सक्षमीकरण धोरणामुळे महिलांना राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात झेप घेण्यास मोठी मदत मिळाली आहे. या ऐतिहासिक धोरणांमुळे महिलांच्या सक्षमीकरणाला मोठे बळ मिळाल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी व बारामती टेक्साटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी सांगितले.
दौंड तालुक्यातील पाटस ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामपंचायत कार्यालय आणि रोटरी क्लब पाटस यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि.१२) जागतिक महिला दिनानिमित्त सन्मान महिला कर्तृत्वाचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनेत्रा पवार होत्या.
यावेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की, ‘महिला आता फक्त गृहिणी म्हणून राहिल्या नाहीत. त्या प्रत्येक क्षेत्रात काम करताना दिसत आहेत. महायुती सरकारने नुकतेच महिलांच्या सक्षमीकरणासाठी नवीन चौथे महिला धोरण आणले. त्यामुळे महिलांच्या प्रगतीला मोठी मदत मिळणार असून, महिलांचे सक्षमीकरण होणार आहे. केवळ महिलांचे सक्षमीकरण करून चालणार नाही, पुरुष आणि मुलांचेही सक्षमीकरण केले पाहिजे. हे धोरण आणून सरकारने महिलांचा सन्मान केला आहे’.
शाळेच्या दाखल्यावर मुलांच्या नावानंतर वडिलांचे नाव असते. मात्र, नवीन धोरणानुसार वडिलांच्या आधी आईचे नाव लावणे आता बंधनकारक असणार आहे. याची सुरुवात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या मंत्रालयाच्या दालनात आपल्या नावात आईचे नाव टाकून केली आहे. अजित पवारांनी या धोरणाची त्वरित आपल्या कृतीतून अंमलबजावणी केली आहे.
तसेच महिलांनी विविध क्षेत्रात काम करताना स्वतःच्या आरोग्याचीही काळजी घेतली पाहिजे. कोरोना महामारीने जगाला धडा शिकवला आहे. यातून बोध घेत महिलांनी काळजी घेतली पाहिजे, असेही सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे.
दौंड तालुक्यात महिलांसाठी नाही मोठा उद्योग-व्यवसाय
दौंडच्या माजी आमदार रंजना कुल म्हणाल्या की, ‘दौंड तालुक्यात महिलांसाठी मोठा उद्योग व्यवसाय नाही, तसेच उच्च दर्जाची शिक्षणसंस्थाही नाही. त्यामुळे महिलांची आणि शालेय मुलांची मोठी गैरसोय होत आहे. बारामतीसारखे उद्योग व्यवसायासाठी दौंडमध्येही टेक्साटाईल सुरू करावे आणि त्यांना हक्काचे उच्च दर्जाचे शैक्षणिक सुविधा उपलब्ध होण्यासाठी पुढाकार घ्यावा’.
राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष वैशाली नागवडे, सिनेअभिनेत्री भार्गवी चिरमुले, स्नेहल भुजबळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. दरम्यान, यावेळी परिसरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी सरपंच तृप्ती भंडलकर, उपसरपंच राजवर्धन शितोळे, ग्रामसेवक अस्मिता चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.