पुणे : निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार एकूण पाच टप्यात महाराष्ट्रात निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे आता प्रत्येक जिल्ह्यात प्रशासनाकडून पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीबाबत सूचना देण्यात येत आहेत. अशीच एक महत्त्वाची सूचना आयोगाने दिली आहे. तु्म्ही व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये असाल किंवा ग्रुपचे ॲडमिन असाल तर ही बातमी तुच्यासाठी महत्त्वाची आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात व्हॉट्सॲप पोस्टमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास व्हॉट्सॲप ग्रुप ॲडमिनला जबाबदार धरले जाणार आहे. कायदेशीर कारवाई देखील होऊ शकते.
छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी रविवारी (ता. १७) पत्रकार परिषदेत काही महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जाणीवपूर्वक खोटी, बनावट माहिती, व्हिडीओ, फोटो, मजकूर सोशल मिडियाद्वारे पसरवणे, जनतेमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण करणे, कायदा सुव्यवस्थेला बाधा आणण्याचा प्रयत्न करणे, धार्मिक जातीय तेढ निर्माण करणे याबाबतचे प्रयत्न रोखण्यासाठी व त्यावर कायद्याद्वारे प्रतिबंध करण्यासाठी विशेष कक्ष स्थापन करुन नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. सोशल मिडीयावरील पोस्टची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. तसेच व्हॉट्सॲप ग्रुपच्या ॲडमिनने अशा माहितीच्या प्रसाराबाबत खातरजमा केली पाहिजे. त्यातून काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास ग्रुप ॲडमिनलाही जबाबदार धरले जाईल.
जिल्ह्यात अतिरिक्त बंदोबस्तासाठी राज्य राखीव दलाच्या तीन तुकड्या तर केंद्रीय राखीव दलाच्या दोन तुकड्या तैनात असणार आहेत. तसेच संवेदनशील व जोखमीच्या मतदान केंद्रांवर वेब कास्टिंगच्या माध्यमातून लक्ष देण्यात येणार आहे. जिल्ह्यात आचारसंहिता भंगाची तात्काळ दखल घेण्याची यंत्रणाही सज्ज करण्यात आली आहे. १९५० टोल फ्रि क्रमांक, ९४ स्थिर सर्व्हेक्षण पथके, तसेच फिरती सर्व्हेक्षण पथके आदींच्या माध्यमातून ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत प्रशासनाचे लक्ष आहे.
दरम्यान, निवडणुकीच्या काळात आचारसंहिता भंग झाल्यास नागरिकही सी व्हिजील या ॲपच्या माध्यमातून आचारसंहिता भंगाच्या तक्रारी प्रशासनापर्यंत पोहोचवू शकतात, असे आचारसंहिता कक्षाचे प्रमुख तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी सांगितले.