जीवन सोनवणे
Bhor News : भोर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने उभारण्यात येत असलेली स्वागत कमान बेकायशीर ठरवत ग्रामपंचायतीने पाडल्याच्या निषेधार्थ सांगलीतील बेडग गावातील आंबेडकरी समाज मुंबईकडे रवाना झाला आहे. यामध्ये चिमुकल्यांसह वयोवृद्ध महिला देखील सहभागी झाल्या आहेत. आज हा लॉंग मार्च पुणे जिल्ह्यात दाखल झाला आहे. सारोळा या ठिकाणी भोर तालुक्यातील आंबेडकर समाजातील सर्व कार्यकर्त्यांनी व समर्थकांनी त्यांचे स्वागत करत, त्यांना समर्थन जाहीर केले.
दीडशेहून अधिक कुटुंबे मंत्रालयाच्या दिशेने निघाली
सांगलीच्या मिरज तालुक्यातल्या बेडग येथे दलित समाजाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्वागत कमान उभारण्यात येत होती. बेडग ग्रामपंचायतीने कमान बांधण्यासाठी परवानगी देखील दिली होती. मात्र, १६ जून रोजी कमान बेकादेशीर असल्याचे ठरवत, ग्रामपंचायतीने बांधकाम सुरू असलेली कमान पाडून टाकली. यानंतर जिल्ह्यातील आंबेडकर प्रेमींनी याला विरोध केला. (Bhor News) त्यानंतर गावामध्ये ग्रामपंचायत विरुद्ध दलित समाज असा संघर्ष सुरू झाला. याच कारणास्तव बेडग येथील दलित समाजाने गाव सोडण्याचा निर्धार केला. घरांना कुलूप लावत, बॅगा भरुन सुमारे दीडशेहून अधिक कुटुंब या मार्चमध्ये सहभागी होऊन मुंबईच्या दिशेने निघाली आहेत.
दरम्यान, बांधकाम पाडल्यानंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कमान पाडणाऱ्या सरपंचासह संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करत बेडग ग्रामस्थांसह जिल्ह्यातल्या समस्त आंबेडकरी कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आले. (Bhor News) प्रशासनाकडून सरपंच उमेश पाटील यांच्यासह संबंधितांना पाठीशी घालण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ज्या गावांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची कमान उभारु दिली जात नाही, त्याला विरोध होतोय आणि न्याय मिळत नाही, या भावनेतून बेडग ग्रामस्थांनी थेट गाव सोडण्याचा निर्धार केला. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात आले.
मुंबईकडे निघालेला हा लॉंग मार्च आज पुणे जिल्ह्यात दाखल झाला. हे नागरिक मुलं-बाळं, जनावरं, संसारोपयोगी साहित्य घेऊन गाव सोडून मंत्रालयाकडे रवाना झाले आहेत. (Bhor News) बेडग गावातून दुसऱ्या गावात पुनर्वसन करावे, अशी मागणी देखील डॉ. बाबासाहेबांनी आंबेडकर स्वागत कमान बचाव कृती समितीने केली आहे. सारोळा याठिकाणी भोर तालुक्यातील आंबेडकर समाजातील सर्व कार्यकर्त्यांनी व समर्थकांनी त्यांचे स्वागत करत, त्यांना समर्थन जाहीर करत, त्यात सहभागी झाले.
या वेळी दलीत पँथरचे पुणे जिल्हा युवक अध्यक्ष विनोद गायकवाड, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे भोर तालुका युवक अध्यक्ष स्वप्निल गायकवाड, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे भोर तालुका अध्यक्ष सुनील गायकवाड, भीम आर्मीचे भोर तालुका अध्यक्ष महिंद्र साळुंके, भारतीय बौद्ध महासभेचे भोर तालुका अध्यक्ष रामभाऊ रणखांबे आदी उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Bhor news : हिर्डोशीत गणेश विसर्जनादरम्यान मधमाशांचा हल्ला; १५० हून अधिक नागरिक जखमी