Bhor News : भोर : राजगड सहकारी साखर कारखाना हा वैयक्तिक राजकीय हेतूमुळे अडचणीत आलेला आहे. कारखान्याचा वापर सातत्याने फक्त राजकीय हेतूसाठी केला जातो. त्यामुळे कोणतीही बँक कर्ज देण्यास अनुकूल नाही. भावनिक आश्वासनावर शेतकरी व कामगारांचे पोट भरत नाही. अन्यायाला वाचा फोडण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने केला; परंतु सत्ताधारी या पत्रकार परिषदेद्वारे जनसामान्यांच्या भावना मांडण्याच्या हेतूला राजकीय स्टंट संबोधून तमाम शेतकरी व कामगारांचा अपमान करीत आहेत, असा आरोप शिवसेनेचे सह संपर्क प्रमुख कुलदीप कोंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला.
राजगड कारखान्यावर सत्ताधारी व विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप
भोर तालुक्यातील शेतकऱ्यांचा तळमळीचा विषय असलेल्या राजगड कारखान्यावर सत्ताधारी व विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत असून, आज पुन्हा एकदा कुलदीप कोंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन आरोपांना प्रत्युत्तर देत सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली. कोंडे म्हणाले की, भावनिक आश्वासनावर शेतकरी व कामगारांचे पोट भरत नाही. राजगड कारखाना वैयक्तिक राजकीय हेतूमुळे अडचणीत आलेला आहे. त्यामुळेच कोणतीही बँक कर्ज देण्यास अनुकूल नाही. आपण गेली अनेक वर्षे पुणे जिल्हा बँकेचे संचालक आहात, तरीही कर्ज का दिले जात नाही? याचे कारण एकहाती सत्ता असून देखील सातत्याने चालू असणारी दिवाळखोरी हे आहे. (Bhor News) तुमचे राजकारण तालुक्याच्या विकासाला व शेतकरी व कामगारांना भोवले आहे. संचालक मंडळाच्या नाकर्तेपणामुळे आम्हाला कारखान्यावर यावे लागते. कारखाना चालवताना झालेल्या चुकांवर पडदा टाकण्यासाठी “मीच सर्व केले आहे. या परिस्थितीसाठी मीच जबाबदार आहे,” असे सांगून कारखान्याच्या मालमत्तेस धक्का लागू देणार नाही व शेतकरी, कामगार, व्यापारी यांची देणी देणार, असे बोलणे म्हणजे निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन केलेले राजकारण आहे.
कोंडे म्हणाले की, कारखान्यावर कोट्यवधी रुपयांचे कर्ज आहे. केवळ निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून दिशाभूल करून वेळ मारून नेण्याचा प्रकार सत्ताधाऱ्यांनी चालवला आहे. स्वतःची मालमत्ता तारण ठेवली आहे, असे सांगून सामान्य शेतकरी, कामगार यांना भावनिक करून वारंवार चालणारा वेळकाढूपणा थांबवा व सत्याला सामोरे जाऊन गरीब शेतकरी, कामगारांची देणी द्या. आम्ही जर वेळोवेळी कारखान्यावर आंदोलन, पत्रकार परिषद घेऊन वस्तुस्थितीचा बोलबाला केला नसता, तर आपणास जाग आली असती का? जाग येऊन वार्षिक सर्वसाधारण सभेत आपण येत्या आठ दिवसांत उसाचा थकीत एफआरपी, कामगारांचे पगार, व्यापाऱ्यांची देणी देऊ अशी आश्वासने दिली. परंतु महिना होत आला तरी एकही आश्वासन नेहमीप्रमाणे पूर्ण झाले नाही. (Bhor News) आश्वासनावर व भावनिक मुद्यावर राजकारण करणे थांबवा, कारण त्याने सामान्य शेतकरी, कष्टकरी कामगार बांधवांचे पोट भरणार नाही. खोटी सबब पुढे न करता, गेल्यावर्षीची राहिलेली देयके व कमीत कमी ३००० रुपये हप्ता देऊन शेतकऱ्यांना दिलासा देऊन, त्यांची दिवाळी गोड करावी.
राजगड कारखाना उशिरा चालू करून कोणता फायदा होणार आहे? जिल्ह्यातील बहुतांश कारखान्यांचे बॉयलर पेटले आहेत व गळीत हंगामास सुरवात देखील झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची उर्वरित सर्व देणी देऊन कारखान्याचा गळीत हंगाम दिवाळीपूर्वी चालू करावा. राज्यशासनाच्या पैशावर डोळा ठेऊन वेळकाढूपणा अंगलट येईल. कारखान्याची देणी देणे संचालक मंडळास बंधनकारक आहे. आपल्याला जर वाटत असेल आम्ही कारखान्यासाठी काय केले. गेली २५ वर्षे मिळेल त्या भावात कोणतीही तक्रार न करता कारखान्याला ऊस घातला आहे. (Bhor News) आम्ही राजकारण करत असताना कोणताही द्वेष मनात न ठेवता खिलाडू वृत्तीने सामोरे जातो हे आपण जाणता व आपण आमचा खेळ देखील पहिला आहे, असेही कोंडे यांनी नमूद केले.
आमच्या सर्व मागण्या मान्य करून शेतकरी, कामगार, व्यापारी यांची देणी देऊन कारखाना दिवाळी अगोदर चालू केल्यास आम्ही सर्व संचालक मंडळाचा हार-तुरे, नारळ देऊन सत्कार करू अन्यथा दिवाळीच्या अगोदर सर्व देणी देऊन गळीत हंगाम चालू न केल्यास आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू, असा इशारा शिवसेना सह संपर्क प्रमुख कुलदीप कोंडे यांनी दिला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Bhor News : निगडे येथे पुढाऱ्यांना गावबंदी अन् मतदानावर बहिष्काराचा मराठा समाजाचा निर्णय