सागर जगदाळे
Bhigwan News : भिगवण : कामगार हा देशाचा कणा आहे. कामगारांना न्याय देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच सक्रिय राहिले आहे. आदरणीय शरद पवार यांच्या दूरदृष्टीमुळे भिगवण परिसरात आशिया खंडातील सर्वांत मोठा कागद प्रकल्प चालू झाला. अनेक कुटुंबांतील सदस्यांच्या हाताला काम मिळाले. भविष्यात कामगारांना न्याय देण्यासाठी कंपनी प्रशासन आणि कंत्राटी कामगार संघटना यांच्यामध्ये बैठक घडवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्यांना न्याय देऊ, असे प्रतिपादन संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी भिगवण येथे बोलताना केले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस संलग्न महाराष्ट्र कंत्राटी कामगार संघटनेच्या फलकाचे उद्घाटन
राष्ट्रवादी कॉंग्रेस संलग्न महाराष्ट्र कंत्राटी कामगार संघटनेच्या फलकाचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पक्षाचे आणि कामगार संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी जेष्ठ पत्रकार आणि महाराष्ट्र कंत्राटी कामगार संघाचे सल्लागार दादासाहेब थोरात यांनी सांगितले की, कंपनी प्रशासन कंत्राटी कामगारांना विश्वासात घेत आहे. (Bhigwan News) मात्र, कंत्राटदार मोठ्या प्रमाणात अन्याय करत असून, त्यांची दलाली संपली पाहिजे यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी कंपनी प्रशासन आणि संघटना यांच्यात समन्वय करावा, अशी विनंती केली.
सल्लागर सागर मिसाळ म्हणाले की, कंपनी प्रशासन चुकीची ध्येयधोरणे राबवत असून, कंत्राटदारांच्या इशाऱ्यावर चालत आहे. कंत्राटी कामगार संघाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे. (Bhigwan News) त्यांना खासदार सुप्रिया सुळे यांनी योग्य समज द्यावी.
कार्यक्रमासाठी पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रवीण माने, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, महारुद्र पाटील, अशोक घोगरे, यांच्यासह भिगवणच्या माजी सरपंच हेमा माडगे, अश्विनी शेंडगे, कामगार संघटनेचे सल्लागार आबासाहेब बंडगर, नवनियुक्त अध्यक्ष उमेश बंडगर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महादेव बंडगर यांनी केले, तर आभार रोहन पिसे यांनी मानले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Bhigwan News : भाजप युवा मोर्चाच्या वतीने भिगवण येथे रक्तदान शिबीर