पुणे : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात कॉंग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पुण्यातील काँग्रसचे बडे नेते आणि माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे आणि त्यांचे पुत्र नगरसेवक अविनाश बागवे हे भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात भाजपकडून मोठ्या घडामोडी होताना दिसत आहेत.
विद्यमान आमदार भाजपचे सुनील कांबळे यांचा पत्ता कट होणार असल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळं बागवे यांना भाजपकडून विधानसभेचे तिकीट मिळणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
बागवे पिता-पुत्रांनी काल (दि. २०) रात्री उशीरा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. रमेश बागवे यांना भाजपमध्ये घेऊन कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून उमेदवारी देण्यासाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आग्रही असल्याची माहिती मिळत आहे. विद्यमान आमदार सुनील कांबळे यांना पुन्हा उमेदवारी देण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि आरपीआयचा विरोध असल्याची देखील चर्चा सुरु आहे.