लोणी काळभोर, ता.१४ : नव्या पिढीला फारसा परिचित नसला तरी जाणत्या पिढीमधील तुमच्या-आमच्या पिढीत साऱ्यांनी खेळलेला खेळ म्हणजे ‘मामाचं पत्र हरवलं, ते मला सापडलं’ मामाचं पत्र म्हणजे आईच्या माहेरचा दुवा होता. माहेरुन ख्याली-खुशाली सांगणारं त्याकाळचं ते १५ पैशांचं पोस्टकार्ड हा जगण्याचा घटक होता आणि तो पत्र आणणारा पोस्टमन आपल्या घराकडे कधी येतो याची सर्वांजण वाट पाहत बसायचे. या पत्राची आठवण म्हणून जागतिक टपाल दिनी लोणी काळभोर (ता. हवेली) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पत्रलेखनाचा एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला होता. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी पोस्टकार्डद्वारे पत्र लिहून, मित्र व शिक्षकांप्रती असणाऱ्या आपल्या भावना व्यक्त केल्या.
देशभरात जागतिक टपाल दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. भारतीय डाक पुणे ग्रामीण विभागातर्फे वेगवेगळे उपक्रम आयोजित करुन डाक सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने लोणी काळभोर येथील टपाल खात्याच्या वतीने एक अनोखा पत्रलेखनाचा उपक्रम घेण्यात आला आहे. यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी मित्र व शिक्षकांप्रती असलेल्या भावना पत्रातून व्यक्त केल्या. यावेळी लोणी काळभोरच्या उप डाकपाल अवंती उगले, डाक सहाय्यक, सुनंदा काचेबोइनवाड, प्राचार्या मीना नेवसे, प्रियंका घोलप,आदित्य रंधरे, विठ्ठल घुटुकडे, यश ससाणे, पोस्टमन भूषण लाघी, सारिका खाडे, संस्कृती मुंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, हि योजना पुणे जिल्हा (ग्रामीण) डाकघर विभागाचे अधीक्षक बाळकृष्ण एरंडे, सहाय्यक अधीक्षक एस् डी मोरे, सहाय्यक अधिक्षक (पश्चिम विभाग) गणेश वडूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर येथील पोस्टाच्या कर्मचाऱ्यांनी राबविली आहे.
लोणी काळभोर पोस्ट ऑफिसमध्ये महिलाराज
लोणी काळभोर येथील पोस्ट ऑफिसमध्ये ४ महिला व १ पुरुष कामाला आहे. महिलावर्ग घरची जबाबदारी व्यवस्थित सांभाळूनसुद्धा आपले पोस्टाचा कारभार बिनचूक हाकीत आहेत. त्यामुळे लोणी काळभोर पोस्ट ऑफिसमध्ये महिलांचे राज आले आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. तसेच महिला सुद्धा पुरुषांप्रमाणे सर्व जबाबदाऱ्या योग्य सांभाळत आहेत. हे चित्र यावरून स्पष्ट दिसून येत आहे.
कर्मचाऱ्यांचे कौतुक
लोणी काळभोर येथील पोस्ट ऑफिसमध्ये डाक जीवन विमा, महिला सन्मान, सुकन्या समृद्धी व विविध प्रकारच्या योजना राबविण्यात अग्रेसर आहे. तसेच नागरिकांचे नवीन खाते उघडण्यास देखील भरीव कामगिरी केली आहे. या पोस्टात नेहमी नागरिकांसाठी विविध उपक्रम राबवून जनजागृती केली जाते. नागरिकांना नेहमी चांगली सेवा देण्यासाठी प्रयत्न केले जातात. त्यामुळे लोणी काळभोर व परिसरातील नागरिकांकडून लोणी काळभोर पोस्टमधील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे.
‘डिजिटल इंडिया फॉर न्यू इंडिया’ विषयावर स्पर्धा आयोजित
भारतीय टपाल विभागातर्फे राष्ट्रीय पातळीवर ‘ढाई आखर’ या शीर्षकाखाली ‘डिजिटल इंडिया फॉर न्यू इंडिया’ या विषयावर पत्रलेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धा सर्व वयोगटातील नागरिकांसाठी खुली आहे. या स्पर्धेसाठी मराठी, हिंदी आणि इंग्रजीसह इतर कोणत्याही बोलीभाषेत पत्र लिहिता येणार आहे. यासाठी अठरा वर्षापर्यंत आणि खुला गट असे दोन विभाग केले आहेत. स्पर्धेसाठी लागणारे अंतर्देशीय पत्रे आणि लिफाफे स्पर्धकांना जवळील पोस्ट ऑफिसमध्ये मिळतील. स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर २०२३ आहे. विजेत्यांना राज्य पातळीवर अनुक्रमे २५ हजार , १० हजार आणि ५ हजार तर केंद्रीय पातळीवर ५० हजार, २५ हजार आणि १० हजार अशी स्वतंत्र बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. तरी सर्व नागरिकांनी सहभाग घ्यावा. सदरील पत्रे हे चीफ पोस्टमास्तर जनरल , महाराष्ट्र सर्कल , मुंबई ४००००१ या पत्यावर पाठवायचे आहे.
– बाळकृष्ण एरंडे, अधिक्षक, पुणे ग्रामीण डाक विभाग