संदीप टूले
केडगाव, ता.२१ : आजार म्हटलं की मानसिक त्रास हा ठरलेला असतो. त्यातून गुडघा दुखणे म्हणजे जवळपास मनुष्याला अंथरूणाला खिळून राहावं लागतं. त्यातून जर परिस्थिती हालाखीची असली की दवाखान्यात जायचं कसं अन् गुडघ्यावर उपचार करण्यासाठी लाखो रूपये आणायचे कुठून, हा मोठा प्रश्नच असतो.
पिंपळगाव (ता. दौंड) येथील वली मोहम्मद हनीफ शेख हे अगदी गरीब कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती आहेत. गुडघेदुखीने त्रस्त आणि शस्त्रक्रियेसाठी लाखो रूपये आणायचे कुठून या चिंतेत होते. पण आमदार राहुल कुल त्यांच्या मदतीला धावले. मुंबईला गुडघ्यावर मोफत यशस्वी शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर शेख त्यांच्या पायांवर चालायला लागले.
पिंपळगाव येथील वली मोहम्मद हनीफ शेख यांना गुडघ्याचा मोठ्या त्रास सुरु होता. त्यांना गुडघ्याच्या त्रासामुळे नीट बसता येत नव्हते की उठताही येत नव्हते. त्यांच्या गुडघ्यांची तपासणी केली असता त्यांच्या गुडघ्यांची शस्त्रक्रिया करावी लागेल, असे डॉक्टरांनी सूचवले. यासाठी शस्त्रक्रिया करताना त्यांना पाच लाख रुपये खर्च सांगितला.
जेमतेम आर्थिक परिस्थिती असणारे हे कुटुंब. उपचाराचा इतका मोठा खर्च कसा करायचा यांची चिंता त्यांना सतावत होती. या कुटुंबाच्या परिस्थितीची सर्व माहिती त्यांच्या सहकाऱ्यांनी आमदार राहुल कुल यांना सांगितली. नेहमी मदत करणारे हात हे वेगळेच असतात. मतदारसंघातील एका जेष्ठ व्यक्तीची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्या पाठोपाठ लगेच चक्रे फिरली.
आमदार कुल यांनी लागलीच त्यांची माहिती घेत मुंबई येथील प्रसिद्ध रुग्णालयात संपर्क साधला. त्यांना रुग्णाची माहिती देऊन तेथे त्यांच्यावर मोफत उपचार करण्याचे सूचित केले. त्यातून वली मोहम्मद शेख यांची पाच लाख रुपये खर्चाची गुडघ्याची शस्त्रक्रिया मुंबईतील त्या नामांकित रुग्णालयात पूर्णपणे मोफत करण्यात आली. शस्त्रक्रिया यशस्वी झाली. एक पायही पुढे न टाकता येणारे शेख हे स्वतःच्या पायावर आता चालत आहेत.
ज्येष्ठांनी शासकीय योजनांची माहिती घ्यावी
वली मोहम्मद हनीफ शेख यांनी आमदार राहुल कुल यांच्या निवासस्थानी आपल्या कुटुंबीयांसह भेट घेतली. त्यांचे आभार मानले. यावेळी आमदार राहुल कुल म्हणाले की, शासनाने जेष्ठांसाठी अनेक आरोग्यसंबंधी योजना सुरू केल्या आहेत. त्यातून पूर्ण मोफत शस्त्रक्रिया केल्या जातात. दौंड तालुक्यात वेगवेगळ्या आजाराने पीडित असलेल्या मतदारांनी या शासकीय योजनांची माहिती घ्यावी. त्यातून उत्तम आरोग्य राखण्याचे काम करा. कार्यकर्त्यांनी अशा ज्येष्ठ नागरिकांना माहिती पुरविण्याचे काम करावे. यावेळी त्यांनी वली मोहम्मद हनीफ शेख यांच्या तब्येतीची आपुलकीने विचारपूस केली.