महेंद्र शिंदे
खेड-शिवापूर, ता. 7 : “एरवी कोंढणपूर फाट्यावरील उड्डाणपुलाखालील रस्त्यावर उभी राहणारी वाहने, भाजी विक्रेते आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी याकडे राजगड वाहतूक पोलिस सोईस्कर दुर्लक्ष करत होते. मात्र बुधवारी या भागात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार येणार असल्याने बुधवारी पोलिसांनी कोंढणपूर फाट्यावरील उड्डाणपुलाखालील अतिक्रमणे, वाहने हटवली. त्यामुळे बुधवारी कोंढणपूर फाट्याने मोकळा श्वास घेतला. अशा प्रकारे पोलिसांनी रोज याठिकाणी लक्ष दिले तर येथील वाहतूक कोंडी कायमची सुटेल,” असे मत स्थानिक नागरीक व्यक्त करत आहेत.
पुणे-सातारा रस्त्यावरील कोंढणपूर फाटा हे कायम वर्दळीचे ठिकाण आहे. पश्चिम हवेली आणि भोर तालुक्यातील अनेक गावात जाण्यासाठीचा हा मार्ग आहे. तसेच याठिकाणी बाजारपेठ असल्याने मोठी वर्दळ असते. मात्र येथील उड्डाणपुलाखालील रस्त्यावर कायम गर्दी असते. भाजी विक्रेते तसेच वाहने उभी केली जात असल्याने उड्डाणपुलाखालील रस्त्यावर कायम वाहनांची कोंडी व्हायची. विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असते.
पुलाखालील या गर्दीतून वाट काढताना पीएमपी बस तसेच अवजड वाहनांना मोठी कसरत करावी लागत असे. तरीही या गंभीर प्रकाराकडे राजगड वाहतूक विभाग सोईस्कर दुर्लक्ष करत असत. मात्र बुधवारी या भागात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार एका कार्यक्रमासाठी येणार असल्याचे समजताच राजगड वाहतूक विभाग जागा झाला.
बुधवारी पुलाखालील भाजी विक्रेते दिसेनासे झाले, तेथे उभी राहणारी वाहने दिसेनासी झाली. बाजुच्या दुकानांसमोर उभी राहिलेली वाहने दिसली नाहीत. जणू कोंढणपूर फाट्याने बुधवारी मोकळा श्वास घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले. केवळ राजकीय लोक येणार असतील तरच नको तर सामान्य नागरीकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन पोलिसांनी सदर ठिकाणी रोज लक्ष दिले तर कोणाचीही गैरसोय होणार नाही, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरीक व्यक्त करत होते.
बसथांबा झालाय भाजीचे दुकान
येथील कोंढणपूर फाट्यावर पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी बस थांबा आहे. मात्र या बस थांब्यात अनेक भाजी विक्रेते भाजी विकण्यासाठी बसतात. त्यामुळे बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना रस्त्यात उभे राहावे लागते.