भोर, ता.6 : शिरगाव येथील जननी माता मंदीरापासून जाणाऱ्या रस्त्यालगत माळरानावर शिर नसलेला मृतदेह आढळून आला होता. या अनोळखी मृतदेहाची ओळख पटविणे पोलिसांसमोर आव्हान होते. मात्र पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून अवघ्या 12 तासाच्या आत अनोळखी मृतदेहाची ओळख पटवून खुनाचा उलघडा करून दोन आरोपींना अटक करण्यात यश आले आहे.
संतोष ऊर्फ प्रमोद रघुनाथ पासलकर वय (वय 40 रा. सोनल हाईटस बी विंग फलॅट नं. 4 रा. वडगाव बु, ता. हवेली जि पुणे) असे खून झालेल्याचे नाव आहे. तर संतोष भिकु पिसाळ (वय- 42 वर्षे सध्या रा. साई प्लॅनेट बिल्डींग फ्लॅट नं. 204 वडगाव बु, ता. हवेली जि.पुणे मुळ रा. रांजे ता. भोर जि. पुणे) व अनिकेत चंद्रकांत पिसाळ (वय- 29 सध्या रा. अनंत सृष्टी फलॅट न. 403 आंबेगाव खुर्द ता. हवेली जि.पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस पाटील सुधीर रामचंद्र दिघे (वय 52, रा. वारवंड ता भोर जि पुणे) यांनी भोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जनावरे चारण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला शिरगाव ग्रामपंचायत हद्दीतील वरंधा घाटात शिर नसलेला पुरुष जातीचा वय अंदाजे 35-40 वर्ष असलेला अनोळखी मृतदेह आढळून आला होता. या घटनेशी माहिती संबंधित व्यक्तीने पोलिस पाटील सुधीर दिघे यांना देली. दिघे यांनी या घटनेची खबर पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच, भोर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. सदर मृतदेहाबाबत खून झाला असल्याचे निष्पन्न झाले होते. याप्रकरणी भोर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103(1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तात्काळ घटनास्थळी रवाना केले. पथकास तपासाच्या अनुषंगाने सूचना व मार्गदर्शन केले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर व त्यांचे सहकारी या गुन्ह्याचा समांतर तपास करत होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पोलिसांना या अनोळखी मृतदेहाची ओळख पटविणे महत्त्वाचे होते.
गुन्ह्याचा तपास करत असताना पथकातील पोलिस हवालदार अमोल शेडगे यांना संतोष ऊर्फ प्रमोद रघुनाथ पासलकर हा दोन दिवसांपासून बेपत्ता आहे. तसेच त्याचा नातेवाईक असलेला संतोष भिकु पिसाळ याच्यासोबत दोन दिवसांपूर्वी भांडणं झाली होती. त्यांचा जुन्या वादावरून एकमेकांवर राग आहे. अशी माहिती पोलिसांना एका खबऱ्या मार्फत मिळाली होती.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी त्या अनोळखी मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला असता, सदर मृतदेह हा संतोष ऊर्फ प्रमोद रघुनाथ पासलकर याचा असल्याची पोलिसांना खात्री पटली. पोलिसांनी संतोष पिसाळ याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, आरोपींनी हा गुन्हा अनिकेत चंद्रकांत पिसाळ याच्या मदतीने केला असल्याची पोलिसांना कबुली दिली आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी रिमांड मंजूर केली आहे. पुढील तपास भोर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आण्णा पवार हे करत आहेत.
सदरची कामगिरी पुणे जिल्हा (ग्रामीण) पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, भोर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आण्णा पवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्ताजीराव मोहिते, हनुमंत पासलकर, पोलिस हवालदार अमोल शेडगे, बाळासाहेब खडके, मंगेश भगत, धीरज जाधव, धर्मवीर खांडे यांच्या पथकाने केली आहे.