पुणे: प्रतिनिधी शिरूर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या कौटुंबिक संपत्तीत मागील पाच वर्षांनंतर दुपटीने वाढ झाली आहे. इतकेच नाही, तर कर्जाच्या रकमेतही वाढ झाली असल्याचे त्यांनी नामनिर्देशन पत्र भरल्यानंतर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात माहिती समोर आली आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रतिज्ञापत्रात नमूद केल्याप्रमाणे कोल्हे यांनी वैद्यकीय क्षेत्रात पदवीचे शिक्षण घेतले असले, तरी ते अभिनय क्षेत्र आणि राजकारणात काम करत आहेत. मागील लोकसभा निवडणुकीत त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केल्याप्रमाणे त्यांची कौटुंबिक संपत्ती सुमारे साडेचार कोटी इतकी होती. यावर्षी स्वतः आणि पत्नी असे कुटुंबाकडे मिळून बँक खात्यात, शेअर्स, बॉण्ड आणि विमा या माध्यमातून तब्बल एक कोटी ३० लाख ६८ हजार ५१५ रुपयांची रक्कम आहे, तर वडील आणि स्वतः कोल्हे यांच्या
नावावर मिळून सात कोटी ११ लाख ३८ हजार ७३६ रुपयांची स्थावर मालमत्ता असल्याचे नमूद केले असे मिळून कोल्हे यांच्याकडे आठ कोटी ४२ लाख ७ हजार २५१ रुपयांची मालमत्ता दाखविण्यात आले आहे.
दरम्यान, मागील लोकसभेत कोल्हे यांच्याकडे अडीच लाखांचे दागिने होते, ज्याची किंमत पाच लाख १६ हजारांवर, तर पत्नीकडे आठ लाखांची दागिने असताना सध्या १६ लाख ७० हजार रुपयांची रक्कम दाखवली गेली आहे. तर जुन्नर येथे वडिलोपार्जित जमीन असल्याचे नमूद केले आहे.