Maharshtra Politcs, पुणे : महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून सरकारचे कामकाज उत्तम चालले आहे. सारे काही आलबेल असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह सर्वच आमदार करत आहेत. मात्र, अजित पवार गट नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निधी वाटपाच्या कारणास्तव आघाडी सरकारमध्ये नाराज होते, तेच कारण अजित पवार गटाच्या नाराजीचे असल्याचे सूर उमटत असल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळत आहे. यामुळे एक वर्तुळ पूर्ण झाल्याची चर्चा आहे.(Ajit pawar)
गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांच्या अनेक बैठका आणि कार्यक्रमांना असलेली अनुपस्थिती हा चर्चेचा विषय ठरत आहे. याबाबत येत्या २१ नोव्हेंबरला अजित पवारांच्या देवगिरी बंगला येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदारांची बैठक बोलावली आहे. अजित पवार गटात विकास निधी वाटपावरुन नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. यावर या बैठकीत चर्चा होणार आहे. निधी वाटपात आमदारांना न्याय मिळत नसल्याची तक्रार वरिष्ठांकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांचे नगरविकास, सामजिक न्याय या खात्यांसह रोजगार हमी, मृदू आणि जलसंधारण, अल्पसंख्याक, ग्रामविकास खात्यांबाबतही अजित पवार गटातील आमदार नाराज आहेत.(Eknath Shinde)
दरम्यान, शिवसेनेत बंड करताना महाविकास आघाडी सरकारमध्ये अर्थमंत्री असलेले अजित पवार निधीवाटप करताना दुजाभाव करत असल्याचा आरोप शिंदे गटातील आमदारांनी केला होता. तीच वेळ आता अजित पवार गटाच्या आमदारांवर आली आहे. प्रत्येकावर वेळ येते असे म्हणतात, हे खरे असल्याची चर्चा यानिमित्ताने होत आहे.(Devendra Fadanvis)