पुणे: पुण्यात गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसायास बाढावा देण्यासंदर्भात अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. मत्स्य खात्याची गोड्या पाण्याच्या तलावातील मासेमारीसंदर्भात आज पुण्यात बैठक पार पडली.
या बैठकीत तलावातील गाळ कसा काढायचा यावर चर्चा झाली. तसेच पुण्यात मोठे मत्स्यालय सुरू करण्याबाबत भाष्य केले. यावेळी या मत्स्यालयासाठी हडपसरमध्ये जागा उपलब्ध असल्याची माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे. ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर या मत्स्य व्यवसायात होणार आहे.
पुण्यात मत्स्य उत्पन्न वाढवण्यासाठी उपाययोजना गरजेच्या आहेत. सध्या या व्यवसायातून अपेक्षित उत्पन्न मिळत नाही, असे मंत्री नितेश राणे म्हणाले. या व्यवसायात पुढील आर्थिक वर्षात बदल दिसून येतील. सांगली, कोल्हापूरमध्ये उत्पादन कमी आहे. तर साताऱ्यात उत्पादन ठीक असल्याचे नितेश राणे म्हणाले. पुण्यात मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी उत्पादन घटल्याचेही राणे यांनी म्हटले आहे. उजनी धरणासारख्या ठिकाणी मत्स्य उत्पादनावर परिणाम झाला असून जलसंपदा खात्याकडून मत्स्य खात्याकडे नियंत्रण आणण्याचा प्रयत्न आहे. मत्स्य शेती करणाऱ्यांच्या आर्थिक वृद्धीसाठी प्रयत्न करणार असल्याचे नितेश राणे म्हणाले.
मत्स्य व्यवसायात होणार ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर
यावेळी बंदर खात्याच्या अपयशावर उपाययोजना करणार असल्याचे मंत्री नितेश राणे म्हणाले. आता एआय तंत्रज्ञानाचा वापर मत्स्य व्यवसायात होणार आहे. रासायनांमुळे प्रदूषण होऊन नुकसान होत असल्यास त्याबाबतही उपाययोजना गरजेची असल्याचे राणे यांनी म्हटले.