हनुमंत चिकणे
लोणी काळभोर (पुणे) : विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून लोणी काळभोर (ता. हवेली) येथील रेनबो इंटरनॅशनल स्कूलमध्ये दोन दिवसीय ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
सांस्कृतिक महोत्सवाची सुरुवात दीपपूजनाने करण्यात आली. संमेलनाचे उद्घाटन रेनबो इंटरनॅशनल स्कूलचे विश्वस्त ह.भ.प रामदास काळभोर, अध्यक्ष नितीन काळभोर, सचिव मंदाकिनी काळभोर, प्राचार्या मिनल बंडगर, उपप्राचार्य प्रशांत लाव्हरे व रेनबो किड्स कायझन- द – प्री स्कूल प्राचार्या ऐश्वर्या काळभोर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात नर्सरी ते इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाची सुरुवात श्रीगणेशाच्या नृत्याने झाली. यावेळी चिमुकल्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्य, नाटक, भारुड, एकपात्री अभिनय, ओवी, गवळण, गोंधळ, भारुड, जोगवा, तांडव, लावणी, डोंबारी, पोतराज, दिंडी, शिवगीत इ. वैविध्य पूर्ण नृत्य अविष्कारातून कला सादर समाजप्रबोधन असे विविध कला प्रकार विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून सादर केले.
विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्य आणि नाटिका सादर करून मने जिंकली. पथनाट्य, जनजागृतीपरगीते, धनगरगीते, कोळी गीत, लावणी, देशभक्तीपर गीत, भक्तीगीत, संगीत कवायत आदींचे सादरीकरण केले. रेनबो इंटरनॅशनल स्कूलचे डान्स कोरिओग्राफर आश्विन मनगुतकर यांच्या मार्गदर्शनाखाली नृत्य सादर करण्यात आले. कार्तिक गोरखे व शिवराज साने या संगीत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी विविध गीतांचे सादरीकरण केले.
दरम्यान, कार्यक्रमाच्या शेवटी मी मराठी या नृत्यामधून रेनबो स्कूल च्या सर्व शिक्षकांना गौरवण्यात आला. कार्यक्रमाचे व्यवस्थापन माधवी सोनी व जयश्री जगताप यांनी केले. पहिल्या दिवशी सूत्रसंचालन व आभार स्वाती धर्माधिकारी व युगंधरा जोशी यांनी केले. तर दुसऱ्या दिवशी ज्योती कुंभार व ऋतुजा देशमुख यांनी केले. रंगभूषा व वेशभूषेचे आयोजन कला शिक्षक दिपक शितोळे यांनी केले होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले.