पुणे : मुलांनी कर्तबगारी दाखविली की आई-वडिलांची मान उंचावते. आयुष्यभर मातीत राबून, कष्ट उपसून ज्या मुलांना लहानाचे मोठे केले, संस्कार दिले, त्या मुलांचे कतृत्व पाहून पालकांना अभिमान वाटतो. अशीच अभिमानास्पद कामगिरी भाटघर धरणाजवळच्या भुतोंडे गावात राहणाऱ्या प्रशांत माने या तरुणाने केली आहे. झोपडीत राहून आयुष्यभर शेतात कष्ट करणाऱ्या आई-वडिलांना स्वतःच्या हाताने टुमदार बंगला बांधून स्वतःच्या हाताने भेट दिला आहे. शेतकरीपुत्र माने आता भाटघर धरणाच्या पंचक्रोशीत चर्चेचा विषय बनला आहे.
भाटघर जलाशयाच्या शेवटच्या भागातील भुतोंडे या गावात थोडी शेती व गाईगुरे पाळून इतरांच्या शेतांवर मजुरी करीत रामचंद्र माने व ताराबाई माने दांपत्याने प्रशांत व प्रवीण अशा दोन मुलांना स्थानिक शाळेत शिकवले. वेल्हा तालुक्यातील गावांमध्ये शेतकऱ्यांचे भात हेच मुख्य पीक आहे. त्यामुळे शेती आणि मजुरी केल्याशिवाय उदरनिर्वाह करता येत नाही. माने दांपत्याने खूप कष्ट उपसले. मात्र, मुलांना उत्तम संस्कार दिले.
आई-वडिलांच्या कष्टाचे मुलाने सोने केले. ३२ वर्षांच्या प्रशांतची वाटचाल प्रेरणादायी आहे. शालेय जीवनापासून सतत धडपड करणारा प्रशांत शेतीत उदरनिर्वाह होत नसल्याचे पाहून पुढे मुंबईला गेला. मुंबईत सतत व्यग्र असलेल्या प्रशांतला कोविडच्या लॉकडाऊनच्या काळात गावात एकटेपण आले. अखेर त्यानेच नवे काही करण्याचा निर्णय घेतला. आयुष्यभर राबणाऱ्या, काबाडकष्ट करणाऱ्या आई-वडिलांना झोपडीतून बंगल्यात नेण्याचे त्याने ठरवले. त्यासाठी त्याने पुढाकार घेतला. यू-ट्यूब पाहून आणि स्थापत्य अभियांत्रिकीची पुस्तके वाचून मूळ गोष्टी समजून घेतल्या. स्वतःच्या हाताने बंगला बांधण्याचा निर्णय घेतला. तो स्वतःच गवंडी झाला. नको म्हणत असतानाही आई-वडील बिगारी बनले. मग, सतत दोन वर्षे राबून प्रशस्त बंगला तयार झाला.
याविषयी बोलताना प्रशांत म्हणाला की, आता १,३५० फुटांचा प्रशस्त बंगला बांधला आहे. त्यासाठी १० लाख रुपये खर्च केले आहेत. कॉलम, बिम भरणे, स्लॅब, प्लॅस्टर अशी कामे मी केली. प्लंबिंग, फॅब्रिकेशन मीच केले. आता फरशी आणि रंगकामही मी करणार आहे. झोपडीत, मातीच्या घरात कोणत्याही शेतकरी आईवडिलांना आपल्या मुलाने टुमदार बंगला बांधावा, असे स्वप्न असते. शेतकऱ्यांच्या मुलांनी जगभर भरारी घ्यावी. पण आपली शेती, गाव आणि आई-वडिलांना कधीही विसरू नये, असे मला वाटते. शेत असो की व्यवसाय; आम्ही दऱ्याखोऱ्यांतील शेतकऱ्यांची मुलं मुळात सतत लढत असतो. बंगला पूर्ण होताच मी पुन्हा गाव सोडून मुंबईला नव्याने दुसरा कोणता तरी बिझनेस करणार आहे. काय करायचे हे ठरलेले नाही. मात्र, लढत राहायचे आहे, असा संकल्प प्रशांतने बोलून दाखवला.