लोणी काळभोर: थेऊर फाट्याकडून थेऊर कडे भरधाव वेगाने चाललेल्या टेम्पोने पायी चाललेल्या तिघांना धडक दिल्याची घटना घडली आहे. हि घटना कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील रेल्वे उड्डाण पूलजवळ रविवारी (ता. २७) रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात तिघेजण जखमी झाले आहेत. तर याप्रकरणी वाहन चालकावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय अजित तिरके (वय २९, पत्ता जैन मंदीर, कामठे वस्ती हडपसर पुणे), उमर मुख्तार खान राजपुत व अनिल किशोर माने (वय व पूर्ण पत्ता माहिती नाही ) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. तर संपत सुभाष आंधळे (वय ३९, रा बाणेगाव ता केज जिल्हा बीड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या वाहन चालकाचे नाव आहे. याप्रकरणी तिरके यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तिरके व त्यांचे मित्र उमर राजपुत व अनिल माने हे केटरींग व्यावसायिकाकडे वेटर म्हणून काम करतात. ते थेऊर येथील वृंदावन पॅलेस मंगल कार्यालय येथे लग्न समारंभातील केटरींग कामासाठी रविवारी (ता. २७) आले होते. थेऊर फाट्या कडून थेऊरकडे पायी चालले होते. पायी चालत जात असताना, रेल्वे उड्डाण पुलाच्या पुढे १०० फुट अंतरावर असताना, तिघांनाही पाठीमागून आलेल्या अशोक लेलंड कंपनीच्या टेम्पोने जोरदार धडक दिली.
दरम्यान, या अपघातात फिर्यादी तिरके यांच्या उजव्या पायाला, गुडघ्याला, उजव्या हाताच्या कोपऱ्याला, उजव्या गालावर गंभीर मार लागला आहे. तर त्यांचा मित्राला उजव्या खांद्याला व डोक्याला मार लागला आहे. तसेच अनिल माने यांच्या डोक्याच्या पाठीमागे, डाव्या पायाच्या पंज्यावर, दोन्ही गुडघ्यावर व कमरेला खरचटुन जखम झाली झाली आहे. या अपघातात तिघेजण जखमी झाले आहेत.
संपत आंधळे याने त्याच्या वाहन भरधाव वेगात चालवुन, वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करुन, हयगयीने, अविचाराने व बेदारकारपणे चालवुन या अपघातास व तिघांना गंभीर दुखापत करण्यास कारणीभूत ठरला आहे. अशी फिर्याद तिरके याने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार वाहन चालक संपत आंधळे यांच्याविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५ (अ), १२५ (२), मोटार वाहन कायदा कलम १८४, ११९/१७७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार महेश करे करीत आहेत.