लोणी काळभोर, ता. 30 : विद्यालयात सन 2004-05 ला दहावीच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थिनी एकमेकांसमोर आल्याने एकमेकांना ओळखू शकत नव्हते. परंतु, ओळखल्यानंतर डोळ्यातील निरागस मैत्री जशीच्या तशी समोर आली. त्याच लाकडी बाकांवरती पुन्हा एकदा आपल्या आवडत्या मैत्रिणीबरोबर बसण्याची हौस प्रत्येकाने भागवून घेतली. आनंद, आश्चर्य आणि कौतुक अशा संमिश्र भावना सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होत्या. याचे निमित्त होते ते स्नेहसंमेलनाचे.
लोणी काळभोर (ता. हवेली ) येथील कन्या प्रशाळेमध्ये शिकणाऱ्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांची तब्बल 20 वर्षानंतर शाळा रविवारी (ता. 27) भरली होती. सर्व विद्यार्थ्यानीचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. या स्नेहमेळाव्याला 80 हून अधिक विद्यार्थिनींनी उपस्थिती दर्शविली. यावेळी माजी शिक्षक शशिराज शेंडगे, राजाभाऊ कदम, दुर्गा सपकाळ, सुषमा गाट, कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका संजीवनी बोरकर, इंग्लिश मीडियमच्या प्राचार्या पौर्णिमा शेवाळे आदि शिक्षक उपस्थित होते.
सर्व माजी विद्यार्थिनी एकत्र आल्यावर सर्वांनी आपला परिचय करून दिला. शालेय जीवनातील काही गंमतीदार आणि काही विनोदी आठवणींना उजाळा दिला. शालेय जीवनातील संस्काराचे धडे, चुकी केल्यानंतर झालेल्या शिक्षा, शाळेतील मस्ती, एकत्रीतपणे केलेला अभ्यास, शिक्षकांचा विद्यार्थ्यांवरील वचक, शाळेतील क्रीडा स्पर्धा, शिक्षकांनी दिलेली शिक्षा, स्नेहसंमेलन आणि त्यातील सांस्कृतिक कार्यक्रमाची धूम अशा विविध विषयांवर माजी विद्यार्थ्याणींनी गप्पा मारून जुन्या आठवणींना उजाळा दिला. या गप्पांच्या ओघात सर्वजण आपण इतके मोठे झालो, हे विसरून गेले होते.
माजी विद्यार्थ्यांनी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 5 फॅन भेट स्वरूपात मुख्याध्यापक संजीवनी बोरकर यांच्याकडे सुपूर्त केले. तर सविता वलटे या विद्यार्थिनीने शालेय रंगकामास 10 हजार रुपयांची मदत केली. शाळेतील माजी विद्यार्थिनी आज राजकारण, शिक्षण, औद्योगिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात काम करीत असून ते आपल्या क्षेत्रात कामाचा वेगळा ठसा उमटवत आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करीत असताना जीवनात यश मिळवले असले तरी त्यामागे शाळेचे संस्कार आहेत. अशी भावना अनेक माजी विद्यार्थिनींनी व्यक्त केली. त्यानंतर स्नेह भोजन व फोटोसेशन झाले. अनेकजण हे आनंदी क्षण आपल्या कॅमेर्यात टिपत होते. या आनंदयात्री सोहळ्यात सर्वच जण हरवुन गेले होते. अशा पद्धतीने शाळेचा स्नेहमेळावा थाटामाटात संपन्न झाला.
दरम्यान, यावेळी माजी विद्यार्थिनी चेतना भोसले, सारिका काळभोर, जयश्री काळभोर, योगिता तिखे, साळुंखे यांनी मनोगते व्यक्त केले. तर या सोहळ्यासाठी कुसुम परदेशी व सोनम कदम विशेष साहाय्य मिळाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली मात्रे यांनी तर आभार मयुरी जगदाळे यांनी मानले.