पुणे : पुण्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जिममध्ये व्यायाम करणाऱ्या तरुणांना शरीरयष्टी चांगली होईल, असे आमिष दाखवून उत्तेजक इंजेक्शन विकले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दोघांवर शिवाजीनगर पोलिसांनी कारवाई केली आहे. आरोपींच्या ताब्यातून पाच हजार रुपयांचे बेकायदेशीर १४ इंजेक्शन्स जप्त करण्यात आली आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी ही माहिती दिली.
या प्रकरणात दीपक वाडेकर (वय ३२, रा. खडकी) व साजन जाधव (२५, रा.औंध) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस हवालदार तेजस चोपडे यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे न.ता.वाडी येथील इराणी वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका कारमध्ये सदरील इंजेक्शन्स घेऊन थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली. औषध घेणाऱ्या व्यक्तीच्या जिवाला धोका होऊ शकतो, हे माहिती असतानाही संबंधित औषधे विकत होते. त्यांनी संबंधित इंजेक्शन त्यांनी कोठून आणली आहेत, ते कोणाला विक्री करणार होते, त्यांचे अन्य साथीदार कोण आहेत याबाबत अधिक तपास सुरू आहे.