पुणे : माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार मिळाल्यानंतर ‘एक्स’वरुन वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात न्यायालयाने त्यांना अटकेपासून तात्पुरता दिलासा दिला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. जी. वेदपाठक यांनी वागळे यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे.
निखिल वागळे यांच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. निखिल वागळे यांनी ४ फेब्रुवारी रोजी माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांच्या ट्विटरवर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केला होता. याप्रकरणी भाजपाचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील विश्वनाथ देवधर (वय ५८, रा. नारायण पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. देवधर यांनी वागळे यांच्यावर जाणीवपूर्वक जातीजातीमध्ये तेढ निर्माण होणारे वक्तव्य करून अडवाणी, मोदी यांच्यासह राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा देखील अपमान केल्याचा आरोप केला होता.
याप्रकरणात एड. असीम सरोदे यांच्यामार्फत न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. त्यानुसार, न्यायालयाने वागळे यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला तसेच वागळे यांनी साक्षीदारांवर दबाव निर्माण करण्याचा आणि तपासात अडथळा आणण्याचा प्रयत्न करू नये असं देखील न्यायालयाने आदेशात नमूद केलं आहे. यासोबतच, तपास अधिकारी बोलावेल तेव्हा दर रविवारी सकाळी अकरा ते चारच्या दरम्यान पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश देखील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. जी. वेदपाठक यांनी दिले आहे.