लोणी काळभोर: आर्थिक अनियमितेमुळे मागील तेरा वर्षापासुन थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखाना बंद असला तरी, त्याच “बंद” कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणुक मात्र “रंगतदार” होण्याची चिन्हे दिसु लागली आहेत. संचालक मंडळाच्या सतरा जागांसाठी 9 मार्च रोजी मतदान होणार असुन, त्यासाठी तब्बल तीनशे वीस उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
आर्थिक अनियमितेमुळे “बंद” असलेल्या कारखान्याच्या निवडणुकीच्या रिंगणात कारखान्याचे माजी अध्यक्ष व पुर्व हवेलीचे नेते प्रा. के. डी. कांचन, कारखान्याचे माजी अध्यक्ष अशोक काळभोर यांचे पुत्र सागर अशोक काळभोर, माजी उपाध्यक्ष राजेंद्र टिळेकर, माजी संचालक पांडुरंग काळे, रामदास पंढरीनाथ चौधरी यांच्यासह कारखान्याच्या अनेक माजी संचालकांबरोबरच कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक प्रकाश जगताप, राजाराम कांचन, प्रशांत काळभोर, हवेली पंचायत समितीचे माजी सदस्य हिरामण काकडे, सुभाष जगताप, अनिल टिळेकर, उरुळी कांचन चे सरपंच भाऊसाहेब कांचन लोणी काळभोरचे सरपंच योगेश काळभोर यांच्यासह पुर्व हवेलीमधील अनेकांनी दंड थोपटल्याचे दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांवरून दिसून येत आहे.
दरम्यान ‘यशवंत’ची निवडणुक जाहीर होण्यापुर्वी पुर्व हवेलीमधील जेष्ठ नेत्यांनी कारखान्याची निवडणुक बिनविरोध करण्यासाठी गावोगावी घोंगंडी बैठका घेऊन प्रयत्न सुरु केले होते. सभासदांचा घोंगडी बैठकांना मिळणारा प्रतिसाद पहाता, कारखान्याची निवडणुक बिनविरोध होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. प्रत्यक्ष निवडणुक जाहीर झाल्यानंतर मात्र निवडणुकीसाठी दाखल झालेले उमेदवारी अर्ज व निवडणुकीच्या रिंगणात उतरु पहाणारे दिग्गज यांची यादी बघता संचालक मंडळाची निवडणुक ही चुरशीची होणार हे नक्की.
साखरेच्या उत्पादनात कधी काळी राज्यात प्रसिध्द असलेला ‘यशवंत’ तेरा वर्षापुर्वी आर्थिक अनियमितेमुळे बंद पडला होता. मागील तेरा वर्षाच्या काळात सत्ताधारी पक्षांनी आपापल्या परीने जसा जमेल तसा कारखाना सुरू करण्याचा प्रयत्न केला. ड्रायपोर्ट, ठराविक जमीन कृषी उत्पन्न बाजार समितीला विकून आलेल्या पैशातून बँका, सभासद व कामगारांची देणी देऊन उर्वरित पैशातून कारखाना सुरू करण्याचे प्रयत्न झाले. परंतु, काही अदृश्य शक्तींच्या जबरदस्त दबावामुळे हे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत व कारखाना सुरू होऊ शकला नाही. संचालक मंडळ अस्तित्वात आल्यास, कारखाना नक्की सुरु होईल, या आशेने बऱ्याच सभासदांनी कोर्टकचेरी करुन, निवडणुकीच्या खर्चासाठी लाखो रुपये जमा केल्यानंतरच ही निवडणूक लागली आहे.
‘यशवंत’ च्या सतरा जागांसाठी ३२० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून, निवडणुकीसाठी कागदोपत्री २१०१९ सभासदांना मतदानाचा अधिकार आहे. मात्र, त्यापैकी अंदाजे चार हजार सभासद शेतकरी मध्यंतरीच्या काळात मयत झाल्याने सभासद मतदारांचा आकडा चौदा ते पंधरा हजाराच्या आसपास असण्याची शक्यता आहे. मतदार संख्येच्या दृष्टीने विचार केल्यास सर्वात जास्त मतदार १८८७ लोणी काळभोर गावात असून सर्वात कमी प्रत्येकी १ मतदार हिंगणे बुद्रुक, कोंढवे बुद्रुक व मोशी या तीन गावात आहेत.
दरम्यान कारखान्याचे माजी अध्यक्ष व पुर्व हवेलीचे नेते प्रा. के. डी कांचन यांच्यासह कारखान्याचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र टिळेकर, माजी संचालक पांडुरंग काळे, अजिंक्य महादेव कांचन, महादेव तुकाराम कांचन, अमित भाऊसाहेब कांचन, संतोष आबासाहेब कांचन, राजीव घुले, तात्यासाहेब काळे, प्रताप बोरकर, रघुनाथ चौधरी, रामदास चौधरी, मिलापचंद गायकवाड, अशोक गायकवाड, सुभाष जगताप, जानकु कदम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक प्रकाश जगताप, राजाराम कांचन, प्रशांत काळभोर, बाजार समितीचे माजी संचालक आप्पासाहेब काळभोर, जिल्हा बँकेचे माजी संचालक माणिक गोते, हवेली पंचायत समितीचे माजी सदस्य हिरामण काकडे, अनिल टिळेकर, लोणी काळभोरचे माजी उपसरपंच अण्णासाहेब काळभोर, सुभाष लक्ष्मण टिळेकर, विठ्ठल शितोळे, योगेश काळभोर, राहुल घुले, नागेश काळभोर, बाळासाहेब काळभोर, महिला गटात किरण काळभोर, भारती शेवाळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
तर वरील प्रमुख उमेदवारांबरोबरच राजेंद्र ज्ञानोबा कांचन, युवराज पंडित कांचन, सुनील सुभाष कांचन, भाऊसाहेब कांचन, ताराचंद साहेबराव कोलते, शंकर ज्ञानोबा कड, सागर हनुमंत चौधरी, राजेंद्र रतन चौधरी, विठ्ठल नारायण खटाटे, राजेंद्र मधुकर चौधरी, गुलाब भागुजी चौधरी, लोकेश विलास कानकाटे, सोमनाथ बबन चौधरी, विठ्ठल राजाराम शितोळे, प्रितम भास्कर काळभोर, राहुल मधुकर काळभोर, गणपतराव दौलतराव काळभोर, नवनाथ तुकाराम काकडे, योगेश प्रल्हाद काळभोर, हिरामण नारायण काकडे, प्रशांत दत्तात्रय काळभोर, प्रताप शंकर बोरकर, मिलिंद शिवाजी काळभोर, आप्पासाहेब रघुनाथ काळभोर, तात्यासाहेब रामचंद्र काळे, सुभाष नरसिंग काळभोर, निलेश अशोक काळभोर, नागेश अंकुश काळभोर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर महिला राखीवमधून काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा किरण शिवदास काळभोर, भारती युवराज शेवाळे, छाया हिरामण काकडे, वंदना राजकुमार काळभोर, राजश्री उदय काळभोर या प्रमुख महिलांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.