लोणी काळभोर : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत लोणी काळभोर (ता. हवेली) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत पाच वर्षाखालील तब्बल २१ हजार १५८ बालकांना रविवारी (ता. ३) पोलिओचा डोस देण्यात आल्याची माहिती लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ डी. जे जाधव व रुपाली भंगाळे यांनी दिली.
पोलिओ लसीकरणापासून एकही बालक वंचित राहू नये, यासाठी फिरती पथके कार्यरत होती. जिल्ह्याप्रमाणेच तालुका आणि ग्रामीण स्तरावरही लसीकरणाचे नियोजन करण्यात आले होते. आरोग्य विभागाने या लसीकरण मोहिमेसाठी आपली यंत्रणा सज्ज केली होती. ‘दोन थेंब प्रत्येक वेळी, पोलिओवर विजय दरवेळी’ ही यंदाच्या पल्स पोलिओ मोहिमेची टॅग लाईन आहे.
नागरिकांनी अफवा, अंधश्रद्धेला बळी न पडता बालकांना पोलिओचा डोस पाजावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ५ वर्षांपर्यंतच्या बालकांना मोठ्या प्रमाणात पोलिओ लसीकरण करण्यात आले.
लोणी काळभोर आरोग्य केंद्रांतर्गत मांजरी, केशवनगर, महादेवनगर, साडेसतरा नळी, कदमवाकवस्ती, रायवाडी व लोणी काळभोर असे सात उपकेंद्र आहेत. या केंद्रांतर्गत पोलिओ लसीकरणासाठी ७६ बूथ ठिकठिकाणी तयार करण्यात आले होते. त्याचबरोबर ४ मोबाईल टीम व लोणी स्टेशन व मांजरी स्टेशनवर ट्रान्सजेट टीम लसीकरण करीत होते. रविवारी (ता. ३) सकाळपासूनच पोलिओ लसीकरणासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
पोलिओ लसीकरणासाठी प्रचंड गर्दी होणार होती. त्यामुळे बालक व त्यांच्या पालकांसाठी डॉक्टरांनी जादा स्टॉल तयार केले होते. त्यामुळे बालकांचे विनाविलंब लसीकरण झाले. लसीकरण लवकर झाल्याने पालक वर्ग आरोग्य विभागाच्या कामगिरीवर खुश होते. एका दिवसात पाच वर्षाखालील तब्बल २१ हजार १५८ बालकांना लसीकरण करून विक्रम केला आहे.
दरम्यान, या लसीकरणासाठी ६ डॉक्टर, कनिष्ठ सहाय्यक१, ३ परिचारिका, नर्सिंगच्या २५ हून अधिक विद्यार्थिनी, ७ आरोग्यसेविका , १सुपरवायझर, पोलिओ सुपरवायझर १६ व आशा वॉर्डन यांनी हे पोलिओचे विक्रमी लसीकरण केले आहे. त्यामुळे सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे लोणी काळभोरसह परिसरातील नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे.
गृहभेटीदरम्यान डोस देण्याचे नियोजन
पल्स पोलिओ लसीकरण दिनाच्या दिवशी बालकांना डोस न मिळालेल्या पालकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. वंचित राहिलेल्या बालकांना गृहभेटीदरम्यान पोलिओ डोस देण्याचे आरोग्य विभागाच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे. हे डोस बालकांना ५ ते ७ मार्च या दरम्यान घरपोच देण्यात येणार आहेत.
डॉ. रुपाली भंगाळे ( आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, लोणी काळभोर, ता. हवेली)