पुणे : नुकत्याच जाहीर झालेल्या संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा स्पर्धा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला. त्यात सारथी पुणे मार्फत प्रायोजित यूपीएससी प्रशिक्षण उपक्रमातील १७ विद्यार्थ्यांची अंतिम गुणवत्ता यादीत निवड झाली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये ४ विद्यार्थिनींचा समावेश आहे.
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे ही संस्था मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या लक्षित गटाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी काम करते. लक्षित गटांतील उमेदवारांचे स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळून विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरीता सारथी संस्था प्रयत्मशील आहे.
या पूर्वी सारथीमार्फत प्रायोजित संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण उपक्रमातील लाभार्थी पैकी ९५ विद्यार्थ्यांची अंतिम गुणवत्ता यादीत निवड झाली आहे. यूपीएससीच्या अंतिम निकालातील उत्तीर्ण १७ विद्यार्थी यांच्या निवडीने, सारथी संस्थेचे एकूण ११२ विद्यार्थी यांची नागरी सेवा स्पर्धा परीक्षाद्वारे निवड झाली असून, सारथी संस्थेने यशाचे शतक पार केले आहे.
सारथी संस्थेचे अध्यक्ष मधुकर कोकाटे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांनी उत्तम प्रशासन करून या देशाच्या विकासात आपला ठसा उमटावा अशा शुभेच्छा व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र निंबाळकर यांनी दिल्या आहेत.
यश मिळवलेले विद्यार्थी पुढील प्रमाणे: शिवांश जगडे, कृष्ण पाटील, अंकेत जाधव, पुष्पराज खोत, मनीषा साकोरे, केतन इंगोले, मोहिनी सूर्यवंशी, कार्तिक बच्चा, संकेत शिंगटे, श्रुती चव्हाण, दिलीपकुमार देसाई, ऋषिकेश गायकवाड, पंकज औटे, कपिल नलवडे, नम्रता ठाकरे, ज्ञानेश्वर मुखेकर, अभिजित अहेर.