पुणे : पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटना काही थांबण्याचं नाव घेत नाहीत. पुण्यातील येरवडा परिसरातील रामनगरमध्ये कोयते हवेत फिरवत उभ्या असलेल्या १२ वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी २६ फेब्रुवारीला रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी आरोपींवर विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करून दोन जणांना अटक केली आहे. अजय चित्रगुप्त बागरी आणि सुमित भारत सितापराव, अशी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, आरोपी सुमित आणि अजय सोमवारी रात्री येरवडा परीसारतील रामनगरमध्ये आले. त्यावेळी त्यांनी रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना धमकावण्यास सुरुवात केली. आरोपींच्या हातात कोयता तसेच हॉकी स्टिक असल्याने नागरिक चांगलेच घाबरले होते. दरम्यान, काही वेळानंतर आरोपींनी भररस्त्यात धुमाकूळ घातला. तसेच परिसरात उभ्या असलेल्या १० ते १२ वाहनांची तोडफोड केली. या प्रकारानातर आरोपी फरार झाले होते. मात्र येरवडा पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवत आरोपींना काही तासातच अटक केली.