उरुळी कांचन (पुणे) : उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील तळवाडी चौकात पिसाळलेल्या कुत्र्यांनी धुमाकुळ घालीत ८ ते १० जणांना जबरी चावा घेवून जखमी केल्याची घटना घडली आहे. यामध्ये दोन लहान मुलांसह महिला व पुरुषांचा समावेश आहे. रविवारी (ता. ३१) संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
या हल्ल्यात काहीजण गंभीर जखमी झाले असून, त्यांना ससून येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. तर काही नागरिकांनी उरुळी कांचन येथील एका खासगी रुग्णालयात जाऊन लस घेतली आहे. भटक्या श्वानांसह त्यातील काही पिसाळलेल्या कुत्र्यांमुळे उरुळी कांचनसह परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरात मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे असून, पिसाळलेल्या कुत्र्यांचाही बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
मागील काही दिवसांपासून मोकाट श्वानांचा सुळसुळाट झाला असून, त्यातील पिसाळलेल्या कुत्र्यांनी उरुळी कांचनसह परिसरातील गावात विविध भागांत चावा घेवून जखमी केल्याच्या घटना वाढू लागल्या आहेत.
रविवारी आठवडी बाजार असल्याने दुकानातून सामान घेऊन येणाऱ्या, दुचाकीवरून निघालेल्या, चौकातून घरी निघालेल्या अशा अनेकांवर कुत्र्याने प्राणघातक हल्ला केला आहे. या हल्ल्यात काहीजण गंभीर जखमी झाले आहेत. यामुळे संपूर्ण उरुळी कांचनसह परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याच्या दहशतीत वावरत आहेत. नागरिकांनी पिसाळलेल्या कुत्र्यापासून सावध राहण्याचे आवाहन उरुळी कांचन ग्रामपंचायत व प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
याबाबत बोलताना उरुळी कांचन ग्रामपंचायतीचे सरपंच भाऊसाहेब कांचन म्हणाले, “लोकांनी घाबरून न जाता तातडीने चावा घेतलेली जागा पाण्याच्या नळाखाली किमान दहा मिनिटे साबणाने धुवावी. परिसरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त लवकरच करण्यात येणार आहे.”