पुणे : केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज खेळाडूंसाठी रोख पुरस्कार तसेच राष्ट्रीय कल्याण आणि पेन्शन (एनएसडीएफ) सुधारित योजना सुरू केली आहे. त्यामुळे पूर्वी होणारा विलंब आता कमी होणार आहे. याशिवाय क्रीडा विभागाच्या योजनांसाठी dbtyas-sports.gov.in हे संकेतस्थळ आणि राष्ट्रीय क्रीडा विकास निधीचे संकेतस्थळ nsdf.yas.gov.in याची सुरुवात केली.
अनुराग ठाकूर यांनी माहिती दिली की, केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये पदक विजेत्यांना तसेच त्यांच्या प्रशिक्षकांना रोख पुरस्कार देण्याच्या य़ोजना, क्रीडा विभागातर्फे राबवण्यात येणाऱ्या पंडित दीनदयाळ उपाध्याय राष्ट्रीय कल्याण आणि गुणवत्ता धारक खेळाडुंना निवृत्तीवेतन (पीडीयूएनडब्ल्यूएफएस) देण्याच्या योजनेत अनेक महत्वाचे बदल केले असून या योजना अधिक खेळाडूस्नेही, सहज उपलब्ध होण्यासारख्या आणि पारदर्शक बनवण्याचा दृष्टीकोन यामागे आहे.
केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले की, या सुधारित योजना क्रीडापटुंना विक्रमी वेळेत लाभ देण्यात अधिक पारदर्शकता आणि उत्तरदायित्व प्रदान करतील.कोणताही वैयक्तिक खेळाडू त्याच्या किवा तिच्या क्षमतेनुसार, तिन्ही योजनांच्या लाभांसाठी थेट अर्ज करू शकेल.
यापूर्वी प्रस्ताव क्रीडा महासंघ किंवा एसएआय (भारतीय क्रीडा प्राधिकरण) यांच्या माध्यमातून येत होते आणि प्रस्ताव सादरीकरणातही मोठा विलंब होत असे. आता विशिष्ट क्रीडास्पर्धा संपण्याच्या तारखेपासून सहा महिन्यांच्या आत अर्जदाराने केवळ ऑनलाईन अर्ज करण्याची आवश्यकता आहे, असे ठाकूर यांनी सांगितले.