(Rahul Gandhi) नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची खासदारकी गेल्यानंतर आणखी एक झटका बसला आहे. राहुल गांधी यांच्याविरोधात हरिद्वार न्यायालयात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला आहे. आरएसएस कार्यकर्ता कमल भदोरिया यांनी हा मानहानीचा खटला दाखल केला आहे. या प्रकरणाची सुनावणी 12 एप्रिल रोजी होणार आहे. हरिद्वार जिल्हा व सत्र न्यायालयातील न्यायदंडाधिकारी द्वितीय शिव सिंह यांच्या न्यायालयाने हे प्रकरण मान्य केले आहे.
राहुल गांधी यांनी आरएसएसला आजचे कौरव म्हटले होते तसेच पुजार्यांविरोधात केलेल्या वक्तव्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरिद्वार सीजेएम न्यायालयाला दिलेल्या या याचिकेत म्हटले आहे की, ९ जानेवारी २०२३ रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हरियाणातील कुरुक्षेत्र येथे एका जाहीर सभेत आरएसएसचे वर्णन आधुनिक युगातील कौरव असे केले होते.
आपल्या वक्तव्यात राहुल गांधी म्हणाले होते…!
आजचे कौरव लाठ्या घेऊन हाफ पँट घालतात आणि शाखा लावतात. राहुल गांधींच्या या वक्तव्यावर आरएसएस कार्यकर्ता कमल भदोरिया यांनी त्यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे.तसेच पुजाऱ्यांविरोधात वक्तव्य केल्याबद्दल राहुल गांधींवरही भदोरिया यांनी हल्लाबोल केला आहे. भदोरिया यांनी अर्जात म्हटले आहे की, राहुल यांनी पुजारी आणि सनातनींना तोडणारे वक्तव्य केले आहे.
यामध्ये म्हटले आहे की, देशातील विविध मंदिरांमध्ये पूजा करूनही काँग्रेस नेत्याने असे वक्तव्य केले आहे. राहुल गांधी यांना 11 जानेवारीला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली होती. यामध्ये त्यांना या वक्तव्याबद्दल माफी मागण्यास सांगण्यात आले आहे. मात्र अद्यापपर्यंत त्यांच्याकडून प्रतिसाद मिळालेला नाही.असे याचिकेत म्हटले आहे.