Praniti Shinde : नागपूर : काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यात विधानसभेत खडाजंगी झाली आहे. सोलापूर सिव्हिल रूग्णालयातील औषध तुटवड्यावरून प्रणिती शिंदे यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर हल्लाबोल केला. “औषधांचं वाटप आरोग्य शिबिरांमध्ये केलं जातं,” असा आरोप प्रणिती शिंदेंनी केला. त्यावर प्रत्युत्तर म्हणून आरोग्यमंत्र्यांनी प्रणिती शिंदेंना खोडकर प्रत्युत्तर दिलं. “तुम्हाला आरोग्य शिबिराचा त्रास होणं स्वाभाविक आहे,” असं प्रत्युत्तर आरोग्यमंत्र्यांनी प्रणिती शिंदेंना दिलं. तानाजी सावंतांच्या या वक्तव्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी आरोग्यमंत्र्यांचे कान टोचले आहेत.
“हिमोग्लोबीन कमी झाल्यावर लोहाची औषधं घ्यावी लागतात. पण, सोलापूर आणि सगळीकडे आरोग्य शिबिरांची संख्या वाढली आहे. आजार नसतानाही लोह आणि साखरेच्या गोळ्यांचं वाटप शिबिरांमध्ये केलं जातं. त्यामुळे सिव्हिल रूग्णालयात गोळ्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. गरोदर महिलांना लोहाच्या गोळ्या उपलब्ध होत नाहीत. विशेष म्हणजे मुदत संपलेल्या गोळ्यांचही वाटप शिबिरांमध्ये केलं जात” असं प्रणिती शिंदे म्हणाल्या. त्याशिवाय सिव्हिल रूग्णालयातील सीटी स्कॅन मशिन बंद आहे. खासगी रूग्णालयात सीटी स्कॅनसाठी पाठवण्यात येते. सीटी स्कॅन नाही, गोळ्या नाहीत, मग आरोग्य कर्मचाऱ्यांचा वापर फक्त शिबिरांसाठीच करणार आहात का?” असा संतप्त सवाल प्रणिती शिंदेंनी उपस्थित केला.
यावर तानाजी सावंतांनी, “सिव्हिल रूग्णालये वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अंतर्गत येतात. आम्ही जनतेची सेवा करत असल्यानं तुम्हाला आरोग्य शिबिराचा त्रास होणं साहजिक आहे. शासकीय विभागातील कुठलीही औषधे शिबिरांमध्ये वापरली जात नाहीत. सेवाभावी संस्थांकडून घेऊन औषधांचं वाटप केलं जातं. तसेच, सिव्हिल रूग्णालयात औषधांचा तुटवडा असल्याबाबत प्रणिती शिंदेंचं एकही पत्र मला मिळालं नाही.” असं म्हटलं. पत्र मिळालं नसल्याच्या वक्तव्यावरून राहुल नार्वेकरांनी तानाजी सावंतांचे कान टोचले. “सरकारकडून काम अपेक्षित असते. विधानसभा सदस्यांनी पत्र दिलं, तरच काम करावं, हे अपेक्षित नाही. प्रणिती शिंदेंनी मांडलेल्या प्रश्नाबाबत उचित कारवाई करावी,” असे निर्देश नार्वेकरांनी तानाजी सावंतांना दिले.