पुणे : राज्यात सत्तातंर होत असतानाच, सोलापुर जिल्हातही राष्ट्रवादीचे मोठे प्रस्थ राजन पाटील म्हणजेच, अनगरचे मालक भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगु लागली आहे. जिल्ह्यात पक्ष वाढीसाठी मालकांच्या दोन पिढ्या रात्रंदिवस झटत असतानाही, पक्षाकडुन होणारी अवेहलना सहन होत नसल्याने मालकांनी कमळ जवळ करण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे. मालकांनी राष्ट्रवादी सोडण्याबाबत दुजोरा दिलेला नसला तरी, फेसबुकच्या माध्यमातुन धाकट्या “युवराजां”चे भाजपा प्रवेशाचे संकेत दिल्याने, आषाढी वारीनंतर सोलापुर जिल्हात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार हे नक्की झाले आहे.
राष्ट्रवादीचे संस्थापक व पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा बालेकिल्ला समजला जाणारा सोलापुर जिल्हा मागिल पाच वर्षात भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला होऊ पहात आहे. सोलापूर जिल्ह्यातील अकरापैकी सात विधानसभा मतदारसंघावर भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व आहे. भारतीय जनता पक्ष संपुर्ण जिल्हावर मांड टाकण्याचा प्रयत्न करत असला तरी, मोहोळ तालुका मात्र अनगरच्या पाठीशी उभा राहिल्याचे चित्र मागिल पस्तीस वर्षापासुन दिसुन येत आहे. मालक दाखवतील ती दिशा व मालक देतील तो उमेदवार अशी मानसिकता मतदारांची असल्याने, मोहोळ तालुक्यात भाजप अथवा शिवसेना रुजु शकलेली नाही. मागिल तीन निवडणुकीत मालक स्वतः उमेदवार नसतानांही, तीनही वेळा मालकांनी दिलेला उमेदवार बहमताने निवडुन अलेला आहे. यावरुनच मोहोळ मतदार संघावर मालकांची पकड किती घट्ट आहे हे दिसुन येते.
तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाला कोणत्याही परीस्थितीत मोहोळ विधानसभा मतदार संघात मुसंडी मारावयाची आहे. मोहोळ बरोबरच जिल्ह्यातील राजकीय विस्तार अधिक जोमाने व्हावा, यासाठी भाजप प्रयत्न शील आहे. त्यातूनच मोहोळ विधानसभा मतदारसंघ जवळ करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्या दृष्टिकोनातून व्यूहरचनाही आखण्यात येत आहे. त्यातच जिल्ह्यात पक्ष वाढीसाठी मालकांच्या दोन पिढ्या रात्रंदिवस झटत असतानाही, पक्षाकडुन होणारी मालकांची अवेहलना सहन होत असल्याची भावना मोहोळ तालुक्यात मोठ्या प्रमानात वाढु लागली आहे.
पुणेकरांचे जावई असलेले कांही जण मोहोळ तालुक्यात मोठ्या साहेबांच्या नावाखाली पक्षात “पाटील”की दाखवत फिरत आहे. या जावायांना पक्ष आवरत नसल्याने, मालकांचे दोन्ही युवराज पक्षावर नाराज असल्याची चर्चा आहे. दोन्ही युवराज कमळाकडे आकर्षित झालेले असले तरी, मालकांनी मात्र याबाबत मौन बाळगल्याने दोन्ही युवराजही सावध पावले टाकत आहेत.
भारतीय जनता पक्षाने यापुर्वीही मालकांना पक्षात येण्याची खुल्ली ऑफर दिलेली आहे. मात्र मालकांचे प्रेम मोठ्या साहेबांच्यावर असल्याने, मालक आत्तापर्यंत पक्ष सोडण्याबाबत विचारही करत नव्हते . मात्र सध्या मालकांची पक्षात होत असलेली मानसिक कुंचबना व दोन्ही युवरांजाचा पक्ष सोडण्याबाबतचा आग्रह लक्षात घेता, मालक घडयाळाच्या काट्यातच अडकून राहाणार की गुंत्यातून बाहेर पडणार ? अनगरकरांच्या प्रवेशासंदर्भात भाजपचा तिसरा प्रयत्न यशस्वी होणार का ? या सर्व प्रश्नांची उत्तरे भाऊसाहेबांच्या फेसबुक पोस्टमध्ये दडली आहेत. त्याची उत्तरे आषाढी वारीनंतर कांही दिवसातच मिळतील असे बोलले जात आहे.