Kolhapur News : कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘शासन आपल्या दारी’ या राज्यशासनाच्या उपक्रमाच्या निमित्ताने मंगळवारी कोल्हापुरात जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय वाद झडत आहेत. विकासकामे, टक्केवारीवरून शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटातील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी राजू शेट्टी यांनी आंदोलनात्मक भूमिका घेतली आहे. तर, विरोधी आमदारांनी जिल्हा नियोजन निधीतील असमानतेबरोबर नाराजीला तोंड फोडले आहे. मागील आठवड्यात झालेल्या हिंसाचाराचे पडसादही या वेळी उमटण्याची चिन्हे आहेत. (Political storm over CM’s visit to Kolhapur; Will there be repercussions of violence?)
शिंदे आणि ठाकरे गटातील वाद पुन्हा एकदा उफाळून येणार
दरम्यान, ठाकरे गट शिवसेनेने कोल्हापुरातील ऐतिहासिक राजाराम तलाव आणि कोल्हापुरातील रस्ते प्रकल्पावरून आंदोलन तापवत ठेवले आहे. (Kolhapur News) या तलाव परिसरात कन्व्हेन्शन सेंटर उभे करण्यासाठी शासनाने १ लाख ३७ हजार चौरस फूट क्षेत्रात बांधकाम होणाऱ्या या कामासाठी १०० कोटी रुपये खर्चास गेल्या महिन्यात मंजुरी दिली आहे. छत्रपती राजाराम महाराज यांनी बांधलेल्या ऐतिहासिक राजाराम तलावातील समृद्ध पर्यावरणावर आघात करणारा हा प्रकल्प आहे.
हा प्रकल्प झाल्यास तलाव आणि परिसरात स्थलांतरित पक्षी, मासे, फुलपाखरे याची विविधता संपुष्टात येणार असल्याने हे केंद्र नजीकच्या शिवाजी विद्यापीठ परिसरात उभारण्यात यावे, अशी मागणी करत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांच्यासह राजाराम जलतरण मंडळाचे अध्यक्ष उदय येवलुजे आदींनी राजाराम तलावाच्या पाण्यात उतरून आंदोलन केले. त्यावरून शिवसेनेच्या दोन गटांतील वादाला तोंड फुटले.(Kolhapur News) विरोधाला विरोध ही भूमिका चुकीची आहे. काम होऊ द्यायचं नाही आणि करूनही देणार नाही ही भूमिका खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा शिंदे गटाचे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी ठाकरे गटाला दिला आहे.
हे काम एकाच ठेकेदाराकडून करून घेण्याचा शासनाचा आदेश टाळून दोन माजी आमदार, चार महापालिकेचे शहर अभियंता यांच्या उपस्थितीत टक्केवारीसाठी व्यवहार झाला, असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख, शहर प्रमुख, माजी नगरसेवक यांनी महापालिकेच्या प्रशासक कादंबरी बलकवडे यांची भेट घेवून केला. (Kolhapur News) कोल्हापुरातील रस्त्यांची दुरवस्था दूर होण्यासाठी राज्य शासनाने १०० कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. त्यामध्ये देखील अर्थपूर्ण व्यवहार केले जात असल्याचा ठाकरे गटाचा आरोप आहे.
प्रशासनाला टार्गेट करताना शिवसैनिकांनी राजेश क्षीरसागर यांच्यावरील जुना राग नव्याने उगाळला आहे. कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात निधी आला असताना त्याला खोडा घालण्याचे काम ठाकरे गटाच्या टोळक्याकडून केला जात आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्याकडे करीत शिंदे गटाने प्रत्युत्तर दिले आहे. (Kolhapur News) मुख्यमंत्री शिंदे यांच्या गतवर्षीच्या दौऱ्यावेळी शिवसैनिकांनी आक्रमक आंदोलन केले होते. यावेळी देखील ते पुन्हा रस्त्यावर येताना दिसत आहेत.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आक्रमक पवित्रा घेतला आहे. उसाची एफआरपी, ऊस दर नियंत्रण समिती, पीक विम्याचे पैसे, प्रोत्साहनपर अनुदान या शेतकऱ्यांच्या प्रश्नांमध्ये कमालीची दिरंगाई होत असल्याचे मुद्दे पुन्हा उपस्थित केले आहेत.(Kolhapur News) मुख्यमंत्र्यांना जाब विचारण्यासाठी शेतकऱ्यांना कोल्हापूरच्या जनता दरबारात हजारोंच्या संख्येने या, अशी आवाहनपर साद राजू शेट्टी यांनी घातली आहे.
दरम्यान, कोल्हापुरातील दंगलीचे वातावरण थंडावले असले तरी राजकीय टीकाटिपणी सुरू आहे. राष्ट्रवादीचे तरुण आमदार रोहित पवार हे मात्र तातडीने घटनास्थळी दाखल झाले.(Kolhapur News) ‘दंगल घडली की घडवली ?’ असा प्रश्न त्यांनी राज्यकर्त्यांना विचारला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा दौरा वादळी ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Kolhapur News : शांतता राखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे : जिल्हाधिकारी
Kolhapur News : कोल्हापूर हिंसाचार! विरोधीपक्षनेते अजित पवारांची प्रतिक्रिया म्हणाले…