लोणी काळभोर, ता. 29: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. तिला न्याय मिळवून देण्यासाठी राज्यातील अनेक सामाजिक संघटना पाठींबा देत आहेत. हे प्रकरण ताजे असतानाच, आता थार गाडी घेण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन येण्याचा लावलेला तगादा आणि शारीरीक व मानसिक छळाला कंटाळून उच्च शिक्षित विवाहितेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत घडली असून बुधवारी (ता.28) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात पतीसह सासरकडील 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे लोणी काळभोरसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी एका 26 वर्षीय विवाहितेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती सौरभ सुनिल सातव (वय-29) सासू सविता सुनिल सातव, सासरे सुनिल शिवाजी सातव (सर्व रा. उरुळी देवाची ता. हवेली जि. पुणे), नंणद साक्षी प्रतिक बोराटे (रा.मोशी), पतीची मैत्रिण अपुर्वा रमेश कड, पतीची मावशी विद्या भुमकर व पतीचे काका अतिष भुमकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहिता या पुण्यातील एका बड्या शैक्षणिक संकुलात काम करीत आहेत. त्यांचा मागील 5 महिन्यापूर्वी उरुळी देवाची येथील सौरभ सातव यांच्याशी विवाह झाला आहे. विवाहाच्या काही दिवसानंतर सौरभ सातवने विवाहितेला त्रास देण्यास सुरवात केली. मात्र यामध्ये फिर्यादीची साथ देण्याऐवजी सासरकडील मंडळींनी सौरभ सातवची साथ दिली.
दरम्यान, विवाहिता काम करीत असलेल्या शैक्षणिक संकुलातून त्यांना मागील काही महिन्यांपासून पगार झाला नव्हता. त्यामुळे घरात खूप मोठा वाद पेटला होता. कारण आरोपींना नवीन थार गाडी घ्यायची होती. त्यासाठी आरोपी हे विवाहितेला थार गाडी घेण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन ये असा तगादा लावला होता. सौरभ सातव हा पिडीतेला मारहाण करून शिवीगाळ करीत होते. तसेच त्याने पिडीतेला जीवे मारण्याची धमकीसुद्धा दिली होती. त्यामुळे विवाहितेला तिचे आईवडील माहेरी घेऊन आले होते.
या सासरकडील मंडळींकडून होणाऱ्या शारीरीक व मानसिक छळाला कंटाळून विवाहितेने टोकाचे पाऊल उचलले. माहेरी राहत असलेल्या घरी बुधवारी (ता.28) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास दोन्ही हाताच्या नसा कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र घरच्यांना दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास जखमी अवस्थेत आढळून आली. त्यानंतर विवाहितेच्या आईवडिलांनी तिला त्वरित लोणी काळभोर (ता. हवेली) येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. तिची प्रकृती स्थित असल्याची माहिती तेथील डॉक्टरांनी दिली आहे.
याप्रकरणी विवाहितेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वरील 7 जणांवर भारतीय न्याय संहिता कलम ८५, ११५(२), ३५२, ३५१ (२) (३), ३५१ (४), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव बोबडे करीत आहेत.
14 पानांची लिहिली सुसाईड नोट
विवाहितेने आत्महत्याचा प्रयत्न करण्यापूर्वी 14 पानांची सुसाईड नोट लिहिली आहे. यामध्ये पतीसह सासरकडील सर्व मंडळींचे कारनामे लिहिले आहेत. सासरच्या मंडळींनी विवाहितेचे स्त्रीधन काढून घेतले आहे. विवाहितेला पैशासाठी मारहाण करून शिवीगाळ केली आहे. विवाहितेला नोकरीतून मिळणाऱ्या पैशावर सासरच्या मंडळींचा डोळा असल्याचे दिसून येत आहे. तसेच पती सौरभ सातव याचे त्याच्याच मैत्रिणीशी विवाहबाह्य संबंध असल्याचे या सुसाईड नोटमध्ये स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ही सुसाईड नोट पोलिसांसाठी एक महत्वाचा पुरावा ठरणार आहे.







