Yavat Murder Case लोणी काळभोर, ता. १३ : यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांचे साम्राज्य दिवसेंदिवस फोफावत असताना आता त्या गुन्हेगारीने थेट खुनापर्यंत मजल मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मटका व्यवसायातून कोट्यवधींची माया जमवणाऱ्या कथित “मटका किंग”ने आणि त्याच्या साथीदारांनी किरकोळ धक्काबुक्कीच्या कारणावरून एका व्यक्तीचा निर्घृण खून केल्याने संपूर्ण दौंड तालुका हादरला आहे. या घटनेनंतर “यवत पोलिसांचा धाक संपलाय का?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. Yavat Murder Case

सहजपूर (ता. दौंड) येथील ओअसीस हॉटेलमध्ये सोमवारी (ता. ११) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा थरार घडला. धनराज शिवाजी भुरके (वय ३९, रा. अंबुलगा मेन, ता. निलंगा, जि. लातूर) यांचा या मारहाणीत मृत्यू झाला. याप्रकरणी दयानंद विश्वनाथ आप्पा भुरके यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून माऊली पांडुरंग जाधव, विशाल मारुती धेंडे (दोघे रा. उरुळी कांचन) आणि नवाज रियाज तांबोळी (रा. यवत) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Yavat Murder Case
मिळालेल्या माहितीनुसार, धनराज भुरके हे त्यांच्या चुलत्यांसह आणि मित्रासोबत ओअसीस हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. जेवण सुरू असताना ते बाथरूमकडे जात असताना आरोपींच्या टेबलाला नकळत धक्का लागला. एवढ्याशा कारणावरून आरोपी संतापले आणि त्यांनी धनराज भुरके यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. काही क्षणांतच हा वाद हिंसक बनला. आरोपींनी खुर्च्या, लाथाबुक्क्या आणि जोरदार मारहाण करत धनराज यांना रक्तबंबाळ केले. गंभीर जखमी झालेल्या धनराज भुरके यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणातील मुख्य आरोपी नवाज तांबोळी हा दौंड तालुक्यातील मोठा “मटका किंग” असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. यवत, बोरीऐंदी, खामगाव, गाडीमोडी आणि सहजपूर परिसरात त्याचे मटक्याचे अड्डे सुरू असल्याचे बोलले जात आहे. अवैध धंद्यातून कोट्यवधींची कमाई करून त्याने परिसरात दहशत निर्माण केली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, “काही पोलीस अधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळेच नवाज तांबोळीची दादागिरी वाढली” असा आरोपही स्थानिक नागरिक उघडपणे करू लागले आहेत. “अवैध धंद्यांवर वेळेत कठोर कारवाई झाली असती, तर आज धनराज भुरके यांचा जीव वाचला असता,” अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत. Yavat Murder Case
यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांचे जाळे?
यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटका, हातभट्टी, अवैध वाळू उपसा, गुटखा विक्री आणि वेश्याव्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. या धंद्यांतून लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याची चर्चा असून, पोलिसांकडून केवळ किरकोळ कारवायांचा दिखावा केला जातो, मात्र मोठ्या धंदेवाल्यांवर ठोस कारवाई होत नसल्याची टीका होत आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात संतापाचे वातावरण असून, “अवैध धंदेवाल्यांना पोलिसांचा धाक उरलेला नाही,” अशी प्रतिक्रिया नागरिक देत आहेत. भरदिवसा खून करून आरोपींनी थेट पोलीस यंत्रणेलाच आव्हान दिल्याची चर्चा सुरू झाली आहे. Yavat Murder Case
खुनाचा गुन्हा दाखल; पण मोठ्या रॅकेटवर कारवाई होणार का? Yavat Murder Case
यवत पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) आणि ३(५) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करून तिन्ही आरोपींना अटक केली आहे. मात्र या प्रकरणामागील अवैध धंद्यांचे जाळे आणि त्याला मिळणारे कथित संरक्षण याचा तपास होणार का? हा खरा प्रश्न आता उपस्थित होत आहे. दौंड तालुक्यातील नागरिक आता उघडपणे म्हणू लागले आहेत. “अवैध धंद्यांना अभय देणाऱ्यांवर कारवाई झाली नाही, तर अशा रक्तरंजित घटना पुन्हा घडत राहतील!”







