पुणे : जिल्हातील अऩेक मातब्बर नेते व कार्यकर्ते मागिल वर्षभरापासुन जिल्हा परीषदेचा सदस्य होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधुन तयार असले तरी, गटात नेमके कोणते आरक्षण पडते हे माहित नसल्याने अऩेक जण शांत होते. मात्र उद्या बुधवारी (ता. 13) रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हा परीषदेच्या श्री. शरदचंद्रजी पवार सभागृह आरक्षण सोड कार्यक्रम होणार असल्याने, त्यानंतरच नेमके कोण भावी सदस्य कोण होणार याची चर्चा सुरु होणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला) व सर्वसाधारण (महिला) यांच्यासाठी आरक्षित जागा निश्चित करण्यासाठी सोडत कार्यक्रम 13 जुलै रोजी होणार आहे. जिल्हा परीषदेसाठी आरक्षण सोडत पुण्यात होत असली तरी, पंचायत समितीच्या गणांची आरक्षण सोडत मात्र त्या-त्या तालुक्याच्या पंचायत समिती कार्यालयात होणार आहे.
दरम्यान, आरक्षण सोडत कार्यक्रमानंतर 15 जुलै रोजी निवडणूक विभाग गट व गणनिहाय आरक्षणाची प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध करणार आहे. या आरक्षणाबाबत 15 जुलै ते 21 जुलै 2022 पर्यंत हरकती तसेच सूचना सादर करता येणार आहेत. 2 ऑगस्ट रोजी राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या निवडणूक विभाग, निर्वाचक गणाचे अंतिम आरक्षण शासन राजपत्रात प्रसिद्ध होणार आहे.
आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्धीनंतर 15 ते 21 जुलै या कालावधीत पुणे जिल्हा परिषद निवडणुक विभागाच्या व पंचायत समिती निर्वाचक गणाच्या आरक्षणावरील हरकती व सूचना ग्रामपंचायत शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे, बी विंग, तिसरा मजला, पुणे-411001 तसेच संबंधित तहसिल कार्यालय येथे कार्यालयीन वेळेत स्विकारण्यात येणार आहेत, असे जिल्हा परिषद व पंचायत समिती जिल्हा नोडल अधिकारी संजय तेली यांनी कळविले आहे.