पुणे : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना केल्यानंतर काँग्रेसमध्ये आता बदलाचे वारे वाहू लागले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पद स्वीकारल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी पक्ष संघटनात्मक बदल प्रक्रियेला सुरुवात केली आहे. या बदलांमध्ये पुण्यातील प्रमुख चार नेत्यांवर हर्षवर्धन सपकाळ यांनी मोठी जबाबदारी सोपवली आहे. यामध्ये काँग्रेस नेते अभय छाजेड,मोहन जोशीसह चौघांचा समावेश आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील काँग्रेस संघटनेमध्ये मोठ्या प्रमाणात बदल बघायला मिळत आहे.दरम्यान पुण्यातील चार काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांवर हर्षवर्धन सपकाळ यांनी चार जिल्ह्यांची निरीक्षक पदाची जबाबदारी सोपवली आहे. त्यानुसार संजय बालगुडे यांच्यावर कोल्हापूर शहर आणि ग्रामीणची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.तसेच मोहन जोशी यांच्याकडे सोलापूरची, रमेश बागवे यांच्याकडे परभणीची आणि अभय छाजेड यांच्याकडे लातूर जिल्ह्याच्या निरीक्षक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या पुणे जिल्ह्याची जबाबदारी ही सतेज पाटील यांच्यावर सोपवल्याची माहिती आहे.हा अहवाल पाहून झाल्यानंतर राज्यभरात आधी मंडल, नंतर शहर, जिल्हा आणि राज्य असे संघटनात्मक बदल करण्यात येणार आहेत. त्यामुळे या निरीक्षकांचे अहवाल अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत.
काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्याकडून नियुक्त करण्यात आलेले निरीक्षक शहर व ग्रामीण जिल्ह्यात जाऊन सर्व ब्लॉक अध्यक्ष,नेते मंडळी, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करणार आहेत. याचा अहवाल पुढील पंधरा दिवसात या निरीक्षकांनी पक्षाला सोपवायचा आहे.त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर येत्या काळात काँग्रेसमध्ये मोठे बदल होणार हे आता निश्चित झाल आहे.