पुणे : राज्यातील बहुतांश भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन तसेच वाहतुक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. त्यामुळे भीमाशंकर कारखान्याची निवडणूक पुढे ढकलली आहे.
दत्तात्रयनगर ( पारगांव ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठीच्या शिंगवे – रांजणी गटातील तीन जागांसाठी उद्या (ता.१७) रोजी होणारी मतदान प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे, अशी माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी,तहसीलदार रमा जोशी यांनी दिली.
शिंगवे – रांजणी गटात तीन जागांसाठी तुकाराम बाबुराव गावडे यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने भीमाशंकर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम, बाबासाहेब खालकर, दादाभाऊ पोखरकर हे तिन्ही विद्यमान संचालक रिंगणात असल्याने तीन जागांच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान होणार होते.
भीमाशंकर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी एकूण २१ जागांपैकी भीमाशंकर कारखान्याचे संस्थापक माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या सह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे एकूण १८ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.