चंदीगड : भारताचा स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग सध्या अडचणीत सापडला आहे. वीरेंद्र सेहवागचा लहान भाऊ विनोद सेहवाग याला चंदिगड पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने फरार घोषित केल्यानंतर सेहवागच्या भावाला चंदीगडच्या मनीमाजरा पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी अटक केली. चेक बाऊन्स प्रकरणी न्यायालयात हजर न झाल्याने विनोद सेहवागला फरार घोषित करण्यात आले होते.
विनोद सेहवागच्या जामीन अर्जावर अद्याप निर्णय झालेला नाही. पोलिसांनी आरोपी विनोद सेहवागला कोर्टात हजर केले, जिथे त्याच्या वकिलाने जामीन अर्ज दाखल केला. मात्र, पोलिसांनी आरोपीच्या जामीन अर्जाला विरोध केला. विनोद सेहवागविरुद्ध चंदीगड जिल्हा न्यायालयात ७ कोटी रुपयांच्या चेक बाऊन्स प्रकरणी खटला सुरू आहे.