नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा याबद्दल केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी सुरू असून सोमवारी त्यासंबंधित युक्तिवाद झाला. राजकारणात अनेक डावपेचांचा अनुभव पाठीशी असणाऱ्या शरद पवारांनी आपल्या एका कुशल खेळीने या सुनावणीदरम्यान अजित पवार गटाला चांगलंच तोंडावर आपटले आहे. अजित पवार गटाने आपल्या गटात असल्याचा दावा केलेल्या एका राष्ट्रीय पदाधिकाऱ्याला शरद पवारांनी थेट केंद्रीय निवडणूक आयोगासमोर उभं केलं आणि अजित पवार गटाची बोलतीच बंद केली. प्रतापसिंह चौधरी असं या व्यक्तीचं नाव असून ते राष्ट्रवादीकाँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत.
अजित पवार गटाकडून जवळपास 8500 हजारापेक्षा अधिक प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आली आहेत. त्यामध्ये कार्यकर्ते आणि पदाधिकारी आपल्यासोबत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. परंतु, हा दावा खोटा असून अजित पवार गटाने दिलेली प्रतिज्ञापत्र ही बोगस असल्याचा दावा शरद पवार गटाने केला. त्याचाच एक भाग म्हणून खासदार शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रताप सिंह चौधरी यांना थेट आयोगासमोर उभं केलं. चौधरी यांनी ही आपण शरद पवार यांच्या गटात असून अजित पवार गटाला कोणतंही प्रतिज्ञापत्र दिलं नसल्याचं सांगितलं.
दरम्यान अजित पवार गटाने राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रतापसिंह चौधरी हे आपल्या गटाचे असल्याचं सांगत त्यांच्या नावाचं एक प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगात सादर केलं आहे. त्यामध्ये प्रतापसिंह चौधरी यांनी अजित पवारांना पाठिंबा दिल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर आजच्या सुनावणीत अजित पवारांनी दावा केलेले प्रतापसिंह चौधरी यांना शरद पवारांनी निवडणूक आयोगासमोर उभं केलं. खासदार शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी युक्तिवाद करताना सांगितलं की, प्रतापसिंह चौधरी यांनी अजित पवार गटाला कधीही प्रतिज्ञापत्र सादर केलं नाही. त्यामुळे त्यांची बोगस सही करून त्यांच्या नावाने आयोगाला प्रतिज्ञापत्र सादर केल्याचं स्पष्ट होत आहे.
सोमवारची सुनावणी संपल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना प्रतापसिंह चौधरी म्हणाले की, “मी राष्ट्रवादीचा संस्थापक सदस्य आहे. तसेच मी राष्ट्रीय सरचिटणीस असून अनेक पदांवर काम केलं आहे. अनेक राज्याच्या निवडणुकींमध्ये पक्षाचा निरीक्षक म्हणून काम केलं आहे. मी सुरूवातीपासून शरद पवार यांच्यासोबतच आहे. मी अजित पवार गटाला तसं कोणतंही प्रतिज्ञापत्र दिलं नाही, माझ्या नावाने जमा करण्यात आलेलं प्रतिज्ञापत्रक बोगस आहे.” असं देखील चौधरी म्हणाले.