नवी दिल्ली: पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तानमधील ९ ठिकाणी हल्ला केला आहे. यामुळे पाकिस्तानचा अहंकार गळून पडला आहे. भारताने पत्रकार परिषदेद्वारे हल्ल्याची माहिती दिली. भारतीय लष्कराच्या महिला अधिकारी लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी यांनी ऑपरेशन सिंदूरची संपूर्ण कहाणी सांगितली. या पत्रकार परिषदेत महिला अधिकारी व्योमिका आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री देखील उपस्थित होते. दोन महिला अधिकाऱ्यांसोबत पत्रकार परिषद आयोजित करून भारताने जगाला महिला शक्तीचा संदेश दिला आहे आणि त्यासोबतच भारतातील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे संकेतही दिले आहेत. या सगळ्यात, कर्नल सोफिया कुरेशी प्रसिद्धीच्या झोतात आल्या आहेत. कर्नल सोफिया कुरेशी कोण आहेत… जाणून घेऊयात सविस्तर
कर्नल सोफिया कुरेशी या भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल पदावरील अधिकारी आहेत. सध्या त्या सिग्नल कॉर्प्समध्ये सेवा देत आहे. कर्नल सोफिया कुरेशी या भारतीय लष्कराच्या पहिल्या महिला अधिकारी आहेत, ज्या लष्कराच्या प्रशिक्षण सराव ‘एक्सरसाइज फोर्स १८’ कार्यक्रमाचे नेतृत्व करत आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेत भारताने पाठवलेल्या पथकाची कमान सोफिया यांना देण्यात आली. या महत्त्वाच्या जबाबदारीसाठी निवडलेल्या काही निवडक प्रशिक्षकांपैकी त्या एक होत्या.
कुरेशी या लष्करी कुटुंबातील
सोफिया कुरेशी या गुजरातच्या रहिवासी आहेत. त्यांचा जन्म १९८१ मध्ये वडोदरा येथे झाला. त्यांनी बायोकेमिस्ट्रीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्या १९९९ मध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशन अंतर्गत भारतीय सैन्यात सामील झाल्या. त्यावेळी त्या फक्त १७ वर्षांच्या होत्या. सोफिया या लष्कराच्या सिग्नल कॉर्प्सचे कार्यालयात कार्यरत आहेत. त्यांना लष्कराची पार्श्वभूमीची आहे. सोफियाचे आजोबाही सैन्यात होते. सोफिया यांचे पती इन्फंट्रीमध्ये आर्मी ऑफिसर आहेत. त्यांना समीर कुरेशी नावाचा मुलगा आहे.
पूरग्रस्तांच्या मदतीत महत्त्वाची भूमिका बजावली
२०१० पासून त्या शांतता मोहिमेत सहभागी आहे. पंजाब सीमेवर ऑपरेशन पराक्रम दरम्यान त्यांनी दिलेल्या सेवेबद्दल त्यांना जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ (जीओसी-इन-सी) कडून प्रशंसा पत्र देखील मिळाले आहे. ईशान्य भारतातील पूर मदत कार्यादरम्यान त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल त्यांना सिग्नल ऑफिसर-इन-सीचे प्रशंसापत्र देखील मिळाले. त्यांचे फोर्स कमांडरकडूनही कौतुक झाले आहे.