आगरताळा : त्रिपुरा पोलिसांनी (Tripura Police) रविवारी (12 नोव्हेंबर) 14 लोकांना अटक केली. त्रिपुरा पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे सर्व बांगलादेशी असून ते अवैधरित्या भारतात प्रवेश करत होते. अवघ्या चार दिवसांपूर्वी राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) आसाम, त्रिपुरामध्ये मानवी तस्करी आणि घुसखोरी विरोधात देशव्यापी छापे टाकून किमान 25 जणांना अटक केली होती.
त्रिपुराच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, दक्षिण त्रिपुरातील सीमावर्ती शहर सबरूम येथील एका घरातून चार महिला आणि चार मुलांसह १४ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. बांगलादेशी नागरिक शनिवारी दक्षिण त्रिपुरामध्ये बेकायदेशीरपणे घुसले आणि सबरूम उपविभागातील वैष्णवपूर गावात एका भारतीय नागरिकाच्या घरी थांबले होते.
नोकरीच्या शोधात बेंगळुरूला जाण्याचा प्रयत्न
या बांगलादेशी नागरिकांनी पोलिसांना सांगितले की, ते नोकरीच्या शोधात बेंगळुरूला जाण्याचा प्रयत्न करत होते. यावर पोलिसांनी सांगितले की, आम्ही अटक केलेल्या बांगलादेशींच्या दाव्याची चौकशी करत आहोत. सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) सोबत पोलिस परदेशी नागरिकांच्या बेकायदेशीर प्रवेशाचा तपास करत आहेत, त्यांना लवकरच स्थानिक न्यायालयात हजर केले जाईल.