Farmers Bharat Bandh : शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलन पुकारलं असून आज भारत बंदची हाक दिली आहे. शेतकऱ्यांनी ‘चलो दिल्ली’चा नारा देत दिल्लीच्या दिशेन कूच करण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीत जाण्यासाठी हजारोंच्या संख्येने आंदोलक शेतकरी हरियाणा आणि पंजाबच्या सीमेवर तळ ठोकून बसले आहेत.
आज पंजाबमध्ये अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी रेल रोको आंदोलन सुरू केलं आहे. आज शेतकरी आंदोलनाचा चौथा दिवस असून संयुक्त किसान मोर्चाकडून आज ग्रामीण भारत बंद पुकारण्यात आला आहे. सकाळी ६ वाजेपासून संध्याकाळी ४ वाजेपर्यंत हा बंद असणार आहे. संयुक्त किसान मोर्चाने इतर सर्व शेतकरी संघटनांना एकत्र येण्याचे आवाहनही केले आहे.
भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी १६ फेब्रुवारीला पुकारलेल्या ग्रामीण ‘भारत बंद’ला वैचारिक बंद म्हटलं आहे. त्यांनी म्हटलं की, ही एक नवीन चाचणी आहे, याला शेती बंद असेही म्हणता येईल. शेतकऱ्यांनी आज शेतात काम करू नये. असं आवाहनही त्यांनी केले आहे.
शेतकऱ्यांनी वर्षभराआधी कृषी कायदे रद्द करण्यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग धरला आहे. किमान आधारभूत किमतीची हमी देण्यासाठी कायदा करावा या मागणीसाठी कामगार संघटनांसह शेतकरी संघटनांनी गेल्या ३ दिवसांपासून आंदोलनाला सुरुवात केली असून आज आंदोलनाचा चौथा दिवस आहे.
आज भारत बंदची (ग्रामीण) हाक
आज भारत बंदची (ग्रामीण) हाक देण्यात आली असून सकाळी ६ ते दुपारी ४ वाजेपर्यंत हा बंद राहणार आहे. त्याआधी, गुरुवारी पंजाबमध्ये अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला आणि टोल प्लाझावर निदर्शने केली. शेतकऱ्यांनी ट्रॅकसह रस्ते अडवले. दोन रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या, तर लुधियाना-साहनेवाल-चंदीगड मार्गावरील सहा गाड्या वळवण्यात आल्या आहेत.
काय बंद?
शेतकऱ्यांनी 16 फेब्रुवारी रोजी ग्रामीण भारत बंदची घोषणा केली आहे. संयुक्त किसान मोर्चाने भारत बंदसाठी मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत. या काळात ग्रामीण भागात वाहतूक, शेतीची कामे, मनरेगा अंतर्गत कामे, खासगी कार्यालये, गावातील दुकाने बंद राहतील. तसेच भाजीपाला आणि इतर पिकांचा पुरवठा आणि खरेदी स्थगित राहील. धान्य बाजार, भाजी मंडई, शासकीय आणि निमसरकारी कार्यालये, ग्रामीण औद्योगिक व सेवा क्षेत्रातील संस्था आणि खाजगी क्षेत्रातील उद्योग बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
काय सुरु?
ग्रामीण भारत बंदमुळे रुग्णवाहिका, वृत्तपत्र वितरण, विवाहसोहळे, वैद्यकीय दुकाने आणि परीक्षांना जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कामकाजावर कोणताही परिणाम होणार नाही. त्यांना थांबवले जाणार नाही, असंही शेतकरी नेत्यांनी म्हटलं आहे.