नवी दिल्ली: राजस्थानसह पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राजकीय पक्ष आपली सर्व ताकद लावत असताना, निवडणूक आयोगही यावेळी कडक भूमिकेत दिसत आहे. निवडणूक आयोगाने उमेदवार आणि राजकीय पक्षांबाबत अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. यावेळी निवडणूक आयोग आता उमेदरांच्या खर्चावर लक्ष ठेऊन आहे. त्याचाच एक भाग म्हणून आयोगाने उमेदवारांच्या खर्चासाठी मेन्यू कार्ड आणि रेट कार्ड जारी केलं आहे. या मेन्यू कार्डमधील चहा, कॉफी, समोसा, रसगुल्ला, आईस्क्रीम यासह प्रत्येक पदार्थाचे दर निश्चित करण्यात आले आहेत. हा खर्च उमेदवाराच्या खात्यात जमा केला जाईल.
केंद्रीय निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या खर्चासाठी मेन्यू कार्ड आणि रेट कार्ड जाहीर केलं आहे. त्यामध्ये चहा 5 रुपये, कॉफी 13 रुपये तर रसगुल्ले आणि द्राक्षे, केळी यासह इतर पदार्थांच्या किमती निवडणूक आयोगाने निर्धारित केल्या आहेत. त्यानुसार उमेदवारांनी आयोगाला त्यांच्या खर्चाचा हिशोब द्यायचा आहे.
आयोगाने प्रचारात वापरण्यात येणाऱ्या साहित्यांची किंमत देखील निर्धारित केली आहे. त्यासंबंधित एक रेट कार्ड तयार केलं असून त्या माध्यमातून उमेदवारांच्या खर्चाची नोंद केली जाणार आहे. प्रत्येक जिल्हा निवडणूक समितीच्या माध्यमातून उमेदवारांच्या या खर्चाची नोंद केली जाणार आहे. यामध्ये एक प्लॅस्टिक खुर्ची 5 रुपये, पाईपची खुर्ची 3 रुपये, व्हीआयपी खुर्ची 105 रुपये, लाकडी टेबल 53 रुपये, ट्यूबलाईट 10 रुपये, हॅलोजन लाईट 500 व्हॅट 42 रुपये आणि 1000 व्हॅट 74 रुपये, सोफा 630 रुपये असा खर्च नोंदवला जाणार आहे.
मेन्यूचा खर्च किती?
केंद्रीय निवडणूक आयोगाने उमेदवारांकडून कार्यकर्त्यांच्या आणि लोकांच्या खाण्या-पिण्यावर करण्यात येणाऱ्या खर्चावरही मोठे निर्बंध आणले आहेत. निवडणूक आयोगाने त्यासाठी मेन्यू कार्ड प्रसिद्ध केलं आहे. मेन्यू कार्डमधील पदार्थांच्या किमती पुढीलप्रमाणे,
- केळी – 21 रुपये डझन
- शेव – 84 रुपये
- द्राक्षे – – 84 रुपये किलो
- RO पाणी – 20 रुपये लिटर
- कोल्ड ड्रिंक – एमआरपी किमतीने
- आईसक्रीम – एमआरपी किमतीने
- उसाचा रस- 10 रुपये ग्लास
- जेवणाची थाळी- 71 रुपये प्लेट
या व्यतिरिक्त प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या गाड्यांच्या भाड्याची किंमतही निवडणूक आयोगाने निश्चित केली आहे. टेम्पो 1260 रुपये, व्हिडीओ व्हॅन 5250 रुपये, ड्रायव्हर मजुरी 630 रुपये, मिनी 20 सीटर गाडीसाठी रोज 6300 रुपये भाडे, 35 सीटर बससाठी 8400 रुपये भाडे या हिशोबाने खर्चाची नोंद ठेवली जाणार आहे.
तसेच चहा पाच रुपये, कॉफी 13 रुपये, समोसा 12 रुपये तर रसगुल्ला प्रति किलोसाठी 210 रुपये खर्च पकडण्यात येणार आहे. उमेदवाराने केलेल्या खर्चाचा हिशोब निवडणूक आयोगाला देणं बंधनकारक आहे.
हेही वाचा:
बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्यावर गोळ्या झाडणारा दुसरा शूटरही नांदेड पोलिसांच्या ताब्यात
छगन भुजबळ आमचे दैवत, त्यांच्या भानगडीत पडू नका नाहीतर; महादेव जानकर यांचा इशारा