भोपाळ: काँग्रेसने मध्य प्रदेशातील चार जागांवर उमेदवार बदलले आहेत. काँग्रेसने सुमावली, पापिरिया, बडनगर आणि जावरा या जागांच्या उमेदवारांमध्ये बदल केले आहेत. काँग्रेसने सुमावलीमधून कुलदीप सिकरवार यांच्या जागी अजबसिंग कुशवाह, पिपरियातून गुरुचरण खरे यांच्या जागी वीरेंद्र बेलवंशी, बडनगरमधून राजेंद्रसिंह सोलंकी यांच्या जागी मुरली मोरवाल आणि जावरामधून हिम्मत श्रीमल यांच्या जागी वीरेंद्र सिंग सोलंकी यांना उमेदवारी दिली आहे.
तिकीट जाहीर झाल्यानंतरही अंतर्गत कलहाचा सामना करणाऱ्या काँग्रेसपुढील अडचणी कमी होत नाहीत. काँग्रेसचे विधानसभा निवडणुकीतील दावेदार सातत्याने वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन तिकीट बदलण्याची मागणी करत होते. अशा परिस्थितीत ऑल इंडिया कांग्रेस कमेटीने चार जागेवर उमेदवार बदलाची घोषणा केली आहे.
यापूर्वी तीन उमेदवार बदलण्यात आले होते. तिसऱ्या यादीत बदल करत काँग्रेसने कमलनाथ सरकारमध्ये विधानसभा अध्यक्ष असलेल्या नर्मदा प्रसाद प्रजापती यांना नरसिंगपूर जिल्ह्यातील गोटेगाव (अनुसूचित जातीसाठी राखीव) येथून, राजेंद्र भारती यांना दतियामधून गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांच्या विरोधात तिकीट देण्यात आले आहेत.