Rajasthan: आज भारतात सर्वत्र होळीचा उत्साह आणि आनंद पाहायला मिळाला. दरम्यान, आनंदात विर्जन म्हणावे अशी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. होळीचा रंग न लावू दिल्याने एका 25 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे. राजस्थान मध्ये दोसा येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. सेलिब्रेशनला गालबोट लागल्याने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. राजस्थान मध्ये रालवास गावामध्ये कालूराम. अशोक आणि बबलू हे तिघं हंसराजला बुधवारी रंग लावायला आले होते. परंतु हंसराजने रंग लावून घेण्यास नकार दिला होता. रंग लावण्यास नकार का दिला असे म्हणत आरोपींना हंसराजला लाथा-बुक्क्या, बेल्टने मारहाण केली.
या दुखद घटनेनंतर हंसराजचा मृतदेह ताब्यात घेऊन त्याच्या कुटुंबियांनी गुरूवारी पहाटेपर्यंत राष्ट्रीय महामार्ग रोखला होता. पोलिसांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मृताच्या कुटुंबाने आंदोलन मागे घेतले आहे. हंसराजच्या कुटुंबाने कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी, 50 लाख मदत आणि आरोपींची तातडीने अटक अशी मागणी केली आहे. या घटनेनंतर परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता. या घटनेनंतर परिसरात शांतता पसरली होती. दरम्यान, आरोपींविरुद्ध कडक कारवाई करत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.