कोल्हापूर: कोल्हापूरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका तरुणाला नग्न करून अमानुषपणे मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. पीडित तरुणाला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोपही या तरुणाने केला आहे. ही घटना कोल्हापूरमधील मुरगुड परिसरात घडली आहे. सौरभ कांबळे (वय 24 वर्ष) असं जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुरगुड परिसरात राहणाऱ्या तीन ते चार जणांनी सौरभचं अपहरण केलं. त्यानंतर विवस्त्र करून रॉड, काठ्या आणि लाथा बुक्क्याने जबर मारहाण केली. मारेकऱ्यांच्या तावडीतून सुटून सौरभने कसाबसा आपला जीव वाचवला. पीडित तरुणाला सीपीआर हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. पीडित तरुणाला मारहाण का करण्यात आली, याचे कारण अजून समोर आलेले नाही.
पीडित तरुणाने सांगितल्यानुसार, ‘मी चहा पित असताना प्रशांत करडे नावाचा एक तरुण तिथे आला. त्यानंतर त्यांनी मला गाडीत बसवलं आणि ते मला कॅनलवर घेऊन गेले. तिथे नेऊन त्यांनी मला नग्न करून बेदम मारहाण केली. मी त्यांच्या तावडीतून कसाबसा निसटून पळालो. मारहाण करतावेळी त्यातला एक जण माझा व्हिडीओ काढत होता. ते मला जातीवाचक शिवी देत होते. तसेच लोखंडी रॉड, लाकडी दांडक्याने त्यांनी मारहाण केली. प्रायव्हेट पार्टला धरून मारहाण केली’.
या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.