नाशिक: म्हसरूळ परिसरात १८ मार्च रोजी मृतदेह आढळलेल्या २१ वर्षीय श्रीकांत उबाळे या तरुणाच्या हत्येप्रकरणी पंचवटी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, श्रीकांतचे आरोपी दीपक काकडेच्या पत्नीशी 3 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. जेव्हा दीपकला या प्रेमसंबंधाची माहिती मिळाली तेव्हा त्याने आणि त्याच्या साथीदारांनी श्रीकांतची हत्या केली आहे. पोलिसांनी दीपक काकडे, सविता काकडे, चंद्रकांत कुलकर्णी आणि राहुल शेळके या चार आरोपींना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आणि सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. श्रीकांत हा अचानक बेपत्ता झाल्याने त्याच्या वडिलांनी प्रकरणी म्हसरूळ पोलिसात तक्रार दाखल केली होती. श्रीकांत हा परभणी जिल्ह्यातील रहिवासी होता आणि गंगाघाट परिसरातील समाधान गायकवाड नामक व्यक्तीकडे केटरिंगचे काम करत होता.
पोलिस तपासात निर्घृण हत्या
पोलिस तपासात असे दिसून आले की, आरोपीने श्रीकांतला मारहाण करून आणि नंतर गळा दाबून निर्घृणपणे हत्या केली होती. त्यानंतर मृतदेह म्हसरूळ परिसरात फेकून दिला होता.